लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) व सलीम खान यांनी भारतातील तीन सुपरस्टार्सबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. हे तीन सुपरस्टार म्हणजे दिलीप कुमार, राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होय. सलीम-जावेद या जोडीने राजेश खन्नांऐवजी अमिताभ बच्चन यांना का पसंती दिली, यामागचं कारण जावेद यांनी सांगितलं. त्यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर खूप कमी काम केलं. कारण अल्पकाळातच त्यांच्याबरोबर काम करणं कठीण झालं. राजेश खन्नांच्या सभोवताली कायम स्वतःच्या स्वार्थासाठी खुशामत करणारी माणसं असायची, असं जावेद म्हणाले.
सलीम-जावेद यांनी राजेश खन्ना यांच्या ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘अंदाज’ या चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स लिहिल्या. पण नंतर या लेखकांच्या जोडीने राजेश खन्नांबरोबर काम केलं नाही.
लहान मुलं आई-बाबाच्या आधी राजेश खन्ना म्हणायचे – जावेद अख्तर
एसएएम यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “तो एक काळ असा होता की जेव्हा भारतात जन्मलेले बाळ आधी ‘राजेश खन्ना’ म्हणायचे आणि नंतर ‘मम्मा, पापा’ म्हणायचे. पण तो काळ जास्त टिकला नाही. नंतर एक वेळ अशी आली जेव्हा आम्हाला जाणवलं की आता त्यांच्याबरोबर काम करणं शक्य नाही. कारण त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक होते, यातले बहुतांशी स्वतःच्या स्वार्थासाठी खुशामत करणारे होते आणि हो ते पुरुष होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं अवघड होतं. आम्ही मित्र होतो, त्यामुळे बऱ्याच काळांनी आम्ही एक चित्रपट केला. पण आम्ही ज्या प्रकारचे चित्रपट लिहित होतो आणि जशा कथा आम्हाला सुचायच्या, त्या अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्यासाठी जास्त सुटेबल होत्या.”
सलीम-जावेद यांच्या चित्रपटांनी अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये सुरुवातीच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशातील सर्वात मोठे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जागा नंतर अमिताभ बच्चन यांनी घेतली. “त्यावेळी अमिताभ बच्चन सुपरस्टार नव्हते, पण ते अभिनय उत्तम करायचे. विजय नावाचं आम्ही लिहिलेलं पात्र ते उत्तम साकारू शकतात, असं आम्हाला वाटलं होतं,” असं जावेद म्हणाले.
अमिताभ बच्चन यांचे केले कौतुक
सलीम-जावेद यांनी ‘क्रांती’ आणि ‘शक्ती’ या चित्रपटांचे लेखनही केले. यात दिलीप कुमार होते. त्यांच्याबरोबर काम करण्याबद्दल विचारलं असता जावेद म्हणाले, “जर तुम्ही अमिताभ बच्चन किंवा दिलीप कुमार यांसारख्या अभिनेत्यांबरोबर काम करत असाल तर तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू शकता. तुम्ही जो सीन लिहाल तो ते जबरदस्त करतील, याची खात्री असते. पण जेव्हा तुम्हाला वाटतं की एखाद्या अभिनेत्याकडे मर्यादित प्रतिभा आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी सोपे सीन लिहिता. पण अमिताभ बच्चन यांना कोणतेही सीन द्या ते उत्तम करतील. तुम्ही त्यांना कोणताही संवाद दिला तरी ते अगदी खरं वाटेल असं परफॉर्म करतील.”
सलीम-जावेद या दोन अप्रतिम लेखकांची जोडी ४० वर्षांपूर्वी वेगळी झाली. दोघांची मुलं सलमान खान, झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांनी एकत्र येऊन ‘अँग्री यंग मेन’ नावाची डॉक्युमेंटरी तयार केली. ही डॉक्युमेंटरी नुकतीच प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd