Javed Akhtar On Religion: प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर हे नेहमीच आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी धर्म, देवावरील श्रद्धा आणि नास्तिकता यावर आपले विचार मांडले. “धर्म हा कठीण काळात माणसाला मानसिक आधार देतो हे खरं असलं, तरी यामुळे तो धर्म किंवा त्याच्या मान्यता खऱ्या ठरत नाहीत. हा आधार केवळ कृत्रिम असतो,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
श्रद्धेबद्दल जावेद अख्तर काय म्हणाले?
इंडियन एक्सप्रेस हिंदीच्या कार्यक्रमात सौरभ द्विवेदींशी बोलताना जावेद अख्तर यांनी मान्य केलं की, धर्म कठीण काळात माणसाला मानसिक आधार देतो, पण यामुळे धर्म किंवा त्याच्या मान्यता खऱ्या ठरत नाहीत. असा आधार कृत्रिम असतो. कारण लोक फक्त मनाच्या समाधानासाठी देवाची संकल्पना धरून ठेवतात, जेणेकरून आपल्यावर कुणाचं तरी लक्ष आहे असं त्यांना वाटत राहावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
जावेद अख्तर यांनी एलॉन मस्कचं दिलं उदाहरण
जावेद अख्तर यांनी हे समजावून सांगताना एलॉन मस्क यांचं उदाहरण दिलं. जर एखाद्याने मस्क माझा भाऊ आहे आणि तो कोट्यवधी रुपये पाठवणार आहेत असं स्वतःला सांगितलं, तर त्या आभासी विचारानेही त्याला आनंदी आणि सुरक्षित वाटू शकते. पण त्यामुळे ती गोष्ट खरी होणार नाही. “पुढच्या महिन्यात तो मला दोन, चार किंवा सहा अब्ज डॉलर्स पाठवणार आहे, यावर विश्वास ठेवा. मग ‘पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात’ असं म्हणत राहा आणि आनंदी राहा. ‘ईलॉन मस्क हा माझा भाऊ आहे,’ असा विचार केला तर किती बरं वाटेल ना? तुम्हाला आनंद होईल, बरोबर?” असं ते म्हणाले.

जावेद अख्तर यांचा श्रद्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन
श्रद्धा ही कधी खरोखरच जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच बहुतांशी लोक त्याच धर्माचे पालन करतात, ज्या धर्मात ते मोठे झाले. “९९ टक्के लोक ज्या धर्मात जन्माला येतात त्याच धर्मात मरतात” असं ते म्हणाले. बालपणापासून वारशाने मिळालेल्या विचार किंवा श्रद्धांऐवजी स्वतःहून स्वतंत्रपणे विचार करून कितीदा श्रद्धा किंवा मतं बनवली जातात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काळानुसार लोकांची मतं बदलू शकत असल्याने, केवळ एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीने म्हटलंय म्हणून विचार स्वीकारण्याऐवजी, त्या विचारांचे स्वतः परीक्षण करून त्यावर प्रश्न उपस्थित केले जावेत, यावर जावेद अख्तर यांनी भर दिला.
“आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही, तर एका विचारसरणीवर विश्वास ठेवतो. ती व्यक्ती उद्या वेगळं काहीतरी बोलली, तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आमचा विश्वास त्या विचारावर, तर्कावर आणि कारणावर असतो,” असं ते म्हणाले. “धार्मिक किंवा श्रद्धाळू व्यक्ती मात्र एखाद्या माणसावर विश्वास ठेवते. कदाचित आपल्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून हे केलेलं असतं किंवा त्या व्यक्तीत त्याला संत दिसतो. जगात १० प्रमुख धर्म आहेत आणि ते सगळे एकसारखेच आहेत असं म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. ते सगळे धर्म एकमेकांपेक्षा वेगळे आहेत,” असं जावेद अख्तर म्हणाले.
