Javed Akhtar Shares Anecdote of Kargil War: काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या काही तळांवर भारताने हल्ले केले आहेत. एका गुप्त मोहिमेंतर्गत हा एअर स्ट्राईक केला गेला आहे. या लष्करी कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे आहे. त्यानंतर १० मे रोजी भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामाची घोषणा केली गेली. आता जावेद अख्तर यांनी पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या भाषणावर वक्तव्य केले आहे.

असीम मुनीर म्हणाले, “आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की, आपण प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत. आपल्या परंपरा वेगळ्या आहेत. आपले विचार वेगळे आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत”. आता असीम मुनीर यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील असल्याचे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की…

जावेद अख्तर यांनी कपिल सिब्बल यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “मी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे भाषण यूट्यूबवर पाहिले. तो असंवेदनशील माणूस वाटत होता. जर तुम्हाला वाटत असेल की, आम्ही वाईट आहोत, तर भारतीयांना शिवीगाळ करा; पण तुम्ही हिंदूंना शिवीगाळ का करीत आहात? पाकिस्तानमध्येदेखील हिंदू लोक राहतात, हे त्यांना समजत नाही का? तुम्ही स्वतःच्या देशातील नागरिकांचा आदर करू शकत नाही का?”

पुढे जावेद अख्तर म्हणाले, “देशातील प्रत्येक नागरिक सारखा असू शकत नाही. जर एखाद्या देशाचे सरकार वाईट असेल, तर त्याचा परिणाम सर्वांत आधी त्यांच्या देशातील नागरिकांवर होतो. त्यामुळे आपल्याला पाकिस्तानमधील नागरिकांबाबत नाही, तर फक्त सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांसंदर्भात समस्या असायला पाहिजे. त्यांच्यामुळे त्रास सहन करणाऱ्या निष्पाप लोकांबरोबर आपली सहानुभूती असली पाहिजे.”

जावेद अख्तर म्हणाले, “त्यांच्या एका क्षेपणास्त्राचं नाव अब्दाली आहे. अब्दालीनं मुस्लिमांवर हल्ला केला होता. तो तुमचा हीरो आहे? तुमच्या मातीत जन्मलेल्या लोकांबद्दल काय? तुमच्यावर ज्यांनी आक्रमण केलं, त्यांचं तुम्ही कौतुक करत आहात? पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल विसंगत आहेत. ते ज्या समुदायांना स्वतःचा समुदाय म्हणून उल्लेख करतात, त्यांना पाकिस्तानशी काहीही संबंध ठेवायचा नाही. अनेक अरब देशांनी पाकिस्तानी लोकांना व्हिसा मिळण्यावर बंदी घातली आहे.”

पाकिस्तानी लष्कराला स्वतःच्या सैन्याबद्दल आदर नसल्याचेदेखील जावेद अख्तर यांनी वक्तव्य केले. जावेद अख्तर यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “जेव्हा आपला एखादा सैनिक शहिद होतो, तेव्हा आपण त्याला सलाम करतो, आदरांजली देतो. पण, जेव्हा पाकिस्तानी सैनिक कारगिल युद्धात मरण पावले तेव्हा त्यांच्या लष्कराने त्यांचे मृतदेहही ताब्यात घेतले नाहीत. भारतीयांनीच ते मृतदेह योग्यरीत्या दफन करण्याचे काम केले. एका भारतीय उच्चपदस्थ सैनिकाने पाकिस्तानच्या शहीद सैनिकांचे फोटो काढले. त्यांचा अल्बम बनवला आणि तो पाकिस्तानी लष्करासमोर सादर केला. त्यांनी तो घेण्यास नकार दिला. नंतर त्यांनी अनधिकृतपणे ते स्वीकारले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३ मध्ये जावेद अख्तर यांनी लाहोरमधील एका कार्यक्रमात दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली होती. भारतीय आणि पाकिस्तानी लोक एकत्र का येऊ शकत नाहीत, असे विचारले असता, जावेद अख्तर यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेला हल्ला प्रत्यक्ष पाहिला होता, अशी आठवण करून दिली. जावेद अख्तर यांनी याआधीही पाकिस्तानमध्ये भारतीय कलाकारांप्रति आदर दाखवला जात नाही, असे वक्तव्य केले आहे.