Jaya Bachchan Birthday special : जया बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी लोकप्रिय अभिनेत्यांसह काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. ९०च्या काळात त्यांची प्रचंड क्रेझ होती. एका काळ असा होता जेव्हा त्या अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही अधिक प्रसिद्ध होत्या. परंतु, लग्नानंतर व मुलांच्या जन्मानंतर त्या पूर्वीप्रमाणे पूर्णपणे मनोरंजनविश्वात सक्रिय राहिल्या नाहीत. 

जया बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आज ९ एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांनी सांगितलेला एक किस्सा सांगणार आहोत. पूर्वी एका मुलाखतीत जया यांनी अमिताभ बच्चन यांच्यामुळे त्यांना धोका होता. असं म्हटलेलं. जया अमिताभ यांच्याबद्दल काय म्हणाल्या होत्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

जया अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाल्या?

अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल मोकळेपणाने वार्ता केली होती. ‘जागरण’च्या वृत्तानुसार जया बच्चन अमिताभ यांच्याबद्दल म्हणालेल्या, “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मला त्यांच्यापासून धोका जाणवला. खरं तर, माझ्या ओळखीतील सगळ्या लोकांपैकी फक्त ह्यांनाच मी मला काहीही बोलण्याचा अधिकार दिला होता.”

पती अमिताभ बच्चन यांच्याबद्दल त्या पुढे म्हणालेल्या, “असं नाहीये की ते प्रत्येकवेळी माझ्यावर हक्क दाखवतात. पण, परिस्थिती अशी होती की ते मला जे काही सांगायचे ते करायला मी लगेच तयार असायचे. खरंतर लोकांना आनंदी ठेवणं हा माझा स्वभाव नाहीये. पण, मला त्यांना नेहमी आनंदी बघायचं असायचं.” त्यावेळी अमिताभ बच्चन यावर “आता परिस्थिती एकदम विरुद्ध आहे. ही किती चांगली गोष्ट आहे.” असं म्हणालेले.

जया बच्चन मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करत म्हणालेल्या, “आमच्या दोघांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. पण, मला असं वाटतं की पहिल्या नजरेतच मला ते आवडले होते.” जया बच्चन व अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलायचं झालं तर माध्यमांच्या वृत्तानुसार जया व अमिताभ यांची पहिली भेट ‘FTII’मध्ये झालेली आणि अमिताभ बच्चन यांची उंची व त्यांचा आवाज यामुळे जया बच्चन प्रभावित झाल्या होत्या. 

असं म्हटलं जातं की पहिल्यांदा जया यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी अमिताभ बच्चन खूप उत्सुक होते. त्यानंतर १९७१मध्ये आलेल्या ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि १९७२मध्ये आलेल्या ‘बंसी बिर्जू’ या चित्रपटात एकत्र काम केलं. त्यानंतर १९७३मध्ये आलेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या ‘जंजीर’ चित्रपटांत दोघांनी  काम केलं. त्याचवर्षी दोघांनी ३ जूनला साध्या पद्धतीने खासगीत लग्न केलं.