Amitabh Bachchan and Rekha relationship: १९७० च्या दशकात अमिताभ बच्चन, जया बच्चन व रेखा यांच्या लव्ह ट्रँगलची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले होते. याचदरम्यान, रेखा व त्यांच्या रिलेशनशिपची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तर्क-वितर्क मांडले जात होते. या सगळ्या प्रकरणात जया बच्चन यांची भूमिका काय होती, अशा अनेक चर्चा झाल्या. ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी एका मुलाखतीत त्याबद्दल वक्तव्य केले होते.
“अमिताभ बच्चन यांचं आधीच…”
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत पूजा सामंत म्हणाल्या होत्या, “दोघांमध्ये कदाचित काही प्रमाणात आकर्षण निर्माण झालं असावं; पण ते प्रेम होतं, असं मला वाटत नाही. कारण- अमिताभ बच्चन यांचं आधीच लग्न झालं होतं.”
रेखा यांनी ऋषी कपूर व नीतू सिंह यांच्या लग्नावेळी काय केले होते, याची आठवणदेखील त्यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, “ऋषी कपूर व नीतू सिंह यांच्या लग्नादिवशी रेखा यांनी कुंकू लावले. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली होती. लोकांचे लक्ष नवदाम्पत्यावर नाही, तर त्यांच्यावर केंद्रित झाले.”
पूजा सामंत यांनी याच मुलाखतीत असाही खुलासा केला होता की, रेखा यांनी अमिताभ यांचे मन जिंकण्यासाठी मांसाहार सोडला होता.
अमिताभ बच्चन किंवा जया बच्चन यांनी या नात्याबद्दल कधीही वक्तव्य केले नाही. मात्र, रेखा वेळोवेळी त्यांच्या भावना व्यक्त राहिल्या. पूजा सामंत म्हणाल्या की, त्यांनी वर्षानुवर्षे अमिताभ बच्चन यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, त्यांनी एकदाही यावर वक्तव्य केले नाही. त्यांनी कायमच रेखा यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. तसेच जया यांनी मुलाखती देणेही टाळले होते.
जया बच्चन यांनी रेखा यांना एकदा जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेवणानंतर रेखा घरी जाण्यासाठी निघत होत्या, त्यावेळी जया बच्चन यांनी स्पष्ट केले की, त्या मिसेस बच्चन आहेत आणि काहीही झाले तरी ती जागा त्यांचीच राहणार आहे. जया बच्चन यांनी रेखा यांना दिलेला हा शेवटचा स्पष्ट इशारा होता, असे म्हटले जाते. एका टप्प्यानंतर अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी एकत्र काम करणेही थांबवले होते.
रेखा यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना एका चाहत्याने सुहाग या चित्रपटातील नृत्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी रेखा म्हणाल्या होत्या की, ज्या व्यक्तीबरोबर मी दांडिया खेळत होते, त्यांचे व्यक्तिमत्त्वच इतके प्रभावी होते की, मला नक्कीच चांगला परफॉर्मन्स करावा लागणार होता. खरे तर मला दांडिया खेळताही येत नव्हते; पण ते माझ्यासमोर उभे राहिले की, मी आपोआपच डान्स करायला सुरुवात करत असे.
दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच कल्की २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
