खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेचा लग्नसोहळा २० जूनला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला. सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानी हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. रेवती व सारंग यांच्या लग्नाला राजकीय वर्तुळातील मान्यवरांसह मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळींनी देखील उपस्थिती लावली होती. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने रेवती-सारंगच्या संगीत सोहळ्यात खास डान्स केल्यानंतर, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनीही आपल्या कुटुंबासह रेवतीच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थिती लावली होती.
बच्चन कुटुंबीय, उद्धव ठाकरे व त्यांचं कुटुंब, उद्योगपती अनिल अंबानी यांनी रेवतीच्या रिसेप्शनला एकत्र एन्ट्री घेतली होती. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी ठाकरे कुटुंबासह खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
संजय राऊतांना पाहताच जया बच्चन यांनी त्यांना ‘भाऊ’ म्हणून आवाज दिला आणि “भाऊ… तुम्ही श्वेताला भेटलात का?” असा त्यांना प्रश्न विचारला. यावर संजय राऊत म्हणाले, “हो, ती भेटली ना मला…” पुढे, जया बच्चन यांनी सर्वांना “श्वेता यांची फॅन आहे…” असं सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक पापाराझींनी हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांनी सुरुवातीला संजय राऊतांशी मराठीत संवाद साधला आहे. श्वेता बच्चन-नंदा ही अमिताभ व जया बच्चन यांची मोठी मुलगी आहे. ती सुद्धा रेवती सुळेच्या लग्नाला उपस्थित होती.
रेवती सुळेच्या लग्नाला काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, राज ठाकरे व कुटुंबीय, मुकेश व नीता अंबानी, अखिलेश यादव, करण जोहर, रणबीर कपूर, जय पवार, धीरज देशमुख, रितेश-जिनिलीया असे बरेच दिग्गज उपस्थित होते.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. पाणी शाश्वत प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासात ही कंपनी कार्यरत आहे. गेल्या आठ वर्षांपासून सारंगही या कंपनीचं काम पाहत असून ते कार्यकारी संचालक पदी आहेत. कौटुंबिक व्यवसायात सक्रिय होण्याआधी त्यांनी बिझनेस डेव्हलोपमेंट कन्सल्टंट म्हणून मॉडर्न हायड्रोजन कंपनीत काम केलं होतं. तर, रेवती सुळेने ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ती राजकारणात सक्रिय नाही, मात्र बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळेने पहिल्यांदाच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
