Jaya Bachchan on Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात. ते अनेकदा त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन करताना ते अनेक किस्से सांगतात. त्यामुळेदेखील ते अनेकदा चर्चेत असतात.
अमिताभ बच्चन हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. ते त्यांच्या ब्लॉगमधूनदेखील अनेक गोष्टी सांगतात. त्यांची मते, एखाद्या चित्रपटाचा किस्सा, कलाकारांबरोबर घडलेल्या गमतीजमती ते या माध्यमातून शेअर करतात.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. तुम्हाला माहीत आहे का? जया यांचे लग्न झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईत एक घर खरेदी केले होते. त्या घराचे नाव प्रतीक्षा, असे आहे.
अमिताभ बच्चन यांनी ते घर आता मुलगी श्वेताला दिले आहे. या घराबरोबर बच्चन कुटुंबाच्या अनेक आठवणी जोडल्या जातात. श्वेता आणि अभिषेक यांचे बालपण त्याच घरात गेले आहे. आता त्या घराचा कायापालट झाला आहे. पण, जेव्हा अमिताभ आणि जया बच्चन पहिल्यांदा आले होते, तेव्हा हे घर वेगळेच होते.
अमिताभ बच्चन यांच्याजवळ स्वत:चे घर होतेच पण…
२००२ मध्ये जेव्हा जया बच्चन यांनी इंडिया टुडे या मासिकासाठी १९७० च्या दशकात त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्या यशाबद्दल एक लेख लिहिला. त्यामध्ये त्यांनी काही आठवणी सांगितल्या होत्या. ते पहिल्यांदा त्या घरात राहायला गेले तेव्हाच्या वातावरणाचे वर्णन त्यांनी केले. जया यांनी या लेखात लिहिले होते की, ते १९७६ मध्ये ‘प्रतीक्षा’मध्ये राहायला गेले होते. त्यावेळी घरात पडदे किंवा खिडक्या नव्हत्या.
जया बच्चन यांनी लिहिले होते, “अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या प्रतीक्षा या घरात आम्ही १९७६ ला राहायला गेलो. तिथे व्यवस्थित पडदे किंवा खिडक्या नव्हत्या, तरीही आम्ही तिथे राहायला गेलो. अमिताभ बच्चन यांच्याजवळ स्वत:चे घर होतेच पण क्वचित वेळी तिथे राहत असत. हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात व्यग्र काळ होता.”
“अभिषेकच्या जन्मानंतर मी आणि अमितजी एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत असू. त्यावेळी ते मोठमोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम करत होते; मात्र घरात सामान्यांप्रमाणे राहत असत. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढत होता. या सगळ्यात मी चित्रपटसृष्टीपासून दूर होत चालले होते. ते त्यांचे काम घरी घेऊन येत नसत. त्यांनी किती चित्रपटांत काम करण्यासाठी करार केला आहे, कोणाबरोबर काम करीत आहेत, हे मला अजिबात माहीत नसायचे. मी त्यांच्याकडे कधीही बिनकामाची चौकशी केली नाही.”
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या घराचे प्रतीक्षा हे नाव त्यांच्या वडिलांनी हरिवंशराय बच्चन यांनी ठेवले होते.
