आज ऐश्वर्या राय तिचा ५३वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने अभिनय क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय सेलिब्रिटी अशी तिची ओळख आहे. मात्र, या सगळ्याबरोबरच बच्चन कुटुंबाची सून म्हणूनही ती नेहमी चर्चेत असते. गेल्या काही वर्षांत नवरा अभिषेक बच्चन, सासरे अमिताभ बच्चन, सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन नंदा यांनी अनेकदा ऐश्वर्याबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत. जया बच्चन यांनी तिला अभिषेकची आदर्श पत्नी असं म्हणत कौतुक केलं होतं.

२००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय विवाहबंधनात अडकल्यानंतर जया बच्चन यांनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सुनेबद्दल भरभरून कौतुक केलं होतं. बच्चन कुटुंबात ऐश्वर्या कशी सामावून गेली, याबद्दल बोलताना जया म्हणाल्या होत्या की, ऐश्वर्या खूप छान आहे आणि त्यांना ती नेहमीच आवडली आहे. कुटुंबात वावरताना ती कधीही आपल्या स्टारडमचा आव आणत नाही. ती शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेते आणि प्रत्येक गोष्ट समजून घेते, हा तिचा गुण त्यांना विशेष आवडतो. शिवाय, कुटुंबातील सदस्यांशी आणि त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींशीही ऐश्वर्याने अगदी सहजपणे जुळवून घेतलं, असं म्हणत जया यांनी सुनेचं कौतुक केलं होतं.

ऐश्वर्या आदर्श पत्नी आणि मोठी स्टार आहे – जया बच्चन

बच्चन कुटुंबासाठी ऐश्वर्या योग्य निवड आहे का, असं जया बच्चन यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या की, “मला तसं वाटतं. ऐश्वर्या स्वतः एक मोठी स्टार आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण आम्ही सगळे एकत्र असतो, तेव्हा ती कधीही ती किती लोकप्रिय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत नाही. तिचा हा स्वभाव मला खूप आवडतो.” असं म्हणत त्यांनी ऐश्वर्याच्या शांत आणि समजूतदार स्वभावाचं कौतुक केलं होतं.

जया बच्चन यांनी ऐश्वर्याच्या शांत आणि समजूतदार स्वभावाचंही कौतुक केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, “ती नेहमी शांतपणे सगळ्यांच्या मागे उभी असते आणि आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असते. बच्चन कुटुंबात ती अगदी सहजपणे सामावून गेली. कोण आपले जवळचे मित्र आहेत आणि कोणाशी कसं वागायचं, याचीही तिला चांगली समज आहे.” ऐश्वर्या अभिषेकसाठी आदर्श पत्नी आहे का, असं विचारलं असता जया यांनी “हो, मला तसंच वाटतं,” असं उत्तर दिलं होतं.

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या आणखी एका भागात जया बच्चन यांनी ऐश्वर्या रायच्या बच्चन कुटुंबात आल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात आनंद आल्याचं सांगितलं होतं. विशेषतः मुलगी श्वेता बच्चन लग्नानंतर सासरी गेल्यामुळे घरात निर्माण झालेली पोकळी ऐश्वर्यामुळे काही प्रमाणात भरून निघाली, असं त्या म्हणाल्या होत्या. अमिताभ बच्चन ऐश्वर्याला पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो, असं सांगताना जया म्हणाल्या होत्या की, “अमितजी जेव्हा जेव्हा तिला पाहतात, तेव्हा त्यांना जणू श्वेता घरी परत आल्यासारखं वाटतं. त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागतात. श्वेता गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी ऐश्वर्या भरून काढेल.”