Jaya Bachchan and Tigmanshu Dhulia:ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्या चर्चेत असतात. त्यांची वक्तव्ये चर्चांचा भाग असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पापाराझींबद्दल केलेल्या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली..

आता सत्या व बँडिट क्वीन या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांनी जया बच्चन यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. तिग्मांशु धूलिया यांनी दिग्दर्शित केलेला हासिल हा चित्रपटही चांगलाच गाजला.

हासिल या चित्रपटात इरफान खान प्रमुख भूमिकेत दिसले होते. खलनायकाची भूमिका त्यांनी साकारली होती. मात्र, या चित्रपटासाठी तिग्मांशु धुलिया यांची पहिली पसंती इरफान खान यांना नव्हती. तर हासिल चित्रपटात प्रमुख भूमिका मनोज वाजपेयींनी करावी, असे त्यांना वाटत होते.

इरफान खान नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याला होती ‘हासिल’साठी पहिली पसंती

‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत तिग्मांशु धुलिया म्हणाले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, सुरुवातीला मी इरफानकडे गेलोच नव्हतो. कारण- ‘सत्या’ आधीच प्रदर्शित झाला होता. त्यामुळे मी मनोज बाजपेयींकडे गेलो होतो. ‘सत्या’मुळे ते लोकप्रिय झाले होते. मनोज आणि मी खूप चांगले मित्र होतो, अजूनही आहोत. मी त्यांना चित्रपटाची गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले होते की, मी खलनायकाची भूमिका करणार नाही.”

मी त्यांना सांगितले, “ही खलनायकाची भूमिका असली तरी हा खलनायक वेगळा आहे. ते माझे मित्र आहेत; पण एकदा त्यांनी नकार दिल्यानंतर मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो नाही.”

“माझ्या चेहऱ्याला काळं…”

याच मुलाखतीत त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “अलाहाबाद युनिव्हर्सिटीत शूटिंग करताना काही समस्यांचा सामना करावा लागला. तेथील उच्च अधिकाऱ्यांना असे वाटत होते की, या चित्रपटात ती संस्था आणि विद्यार्थ्यांचे राजकारण नकारात्मकरीत्या दाखवले जात आहे. परिस्थिती इतकी बिघडली की, त्यांना मला धमक्या दिल्या.

जया बच्चन यांनी ‘अशी’ केली मदत

मला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. तिथे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी संघांचे सर्व अध्यक्ष बसले होते. त्यांनी मला धमकी दिली की आम्ही जर शूटिंग सुरू ठेवले, तर ते शूटिंगची आमची सर्व वाहने फोडतील, माझ्या चेहऱ्याला काळे फासतील, मला गाढवावर बसवून संपूर्ण शहरात फिरवतील आणि मी तिथे एकटाच होतो. समोर सगळे पुरुष बसले होते. मी रडायला लागलो.”

अखेरीस तिग्मांशु धुलिया यांनी जया बच्चन यांची मदत घेतली. त्याबद्दल सांगत ते म्हणाले, “शेवटी मला जयाजींना फोन करावा लागला. त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी अमर सिंहजींना फोन केला आणि त्यांनी इतर काही लोकांना फोन केले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, तुम्ही चित्रपटात ‘अलाहाबाद’ हा शब्द वापरू शकत नाही. मी ते नाव न वापरता तो चित्रपट पूर्ण केला.”