ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्या सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांची मतं ठामपणे मांडत असतात. आता त्यांनी लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. जया यांनी नुकतीच ‘We the Women’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी लग्न ही कालबाह्य संकल्पना असल्याचं विधान केलं. तसेच नात नव्या नवेली नंदाने लग्न करू नये, असंही त्या म्हणाल्या.
तुम्ही लग्नासाठी करिअर सोडलं होतं, तसं नव्याने करावं असं तुम्हाला वाटतं का? असं बरखा दत्तने विचारल्यावर जया बच्चन म्हणाल्या, “नव्याने लग्न करू नये असं मला वाटतं.” यावर लग्न ही एक कालबाह्य गोष्ट आहे, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न जया बच्चन यांना विचारला. त्यांनी होकार दिला. “हो. आता मी आजी आहे. नव्या काही दिवसांनी २८ वर्षांची होईल. आता तरुणींना मुलांच्या संगोपनाबद्दल सल्ले देण्यासाठी मी खूप म्हातारी झाले आहे. गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत. आजकालची लहान मुलं इतकी हुशार आहेत की ते प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मात देतात,” असं जया बच्चन यांनी नमूद केलं.
जया बच्चन यांनी लाडवाशी केली लग्नाची तुलना
जया बच्चन लग्नाची तुलना लाडवाशी करत म्हणाल्या, “लग्न दिल्लीतील लाडवासारखं आहे. खाणंही कठीण आणि खाल्ल्याशिवाय राहणंही कठीण. त्यामुळे फक्त तुमचं आयुष्य एंजॉय करा.”
पापाराझींवर का भडकतात जया बच्चन?
जया बच्चन पापाराझींवर कायम भडकलेल्या दिसतात. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना पापाराझींवर रागावण्यामागचं कारण सांगितलं. “अत्यंत वाईट कपडे घालून बाहेर हातात फोन घेऊन उभे आहेत ना. ज्यांना वाटतं की त्यांच्या हातात फोन आहे तर ते तुमचे फोटो घेऊ शकतात, वाट्टेल ते बोलू शकतात. ते कशा घाण कमेंट्स करतात. माझे वडील पत्रकार होते, त्यामुळे पत्रकारिता काय असते ते मला माहित आहे,” असं जया बच्चन म्हणाल्या.
जया बच्चन चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. त्या ‘दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात वामिका गब्बी व सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिका साकारत आहेत.
