१९८१ मध्ये यश चोप्रा यांनी ‘सिलसिला’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. विवाहबाह्य संबंधांवर आधारित हा चित्रपट त्यांनी अशा वेळी बनवण्याचं ठरवलं, जेव्हा ते व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या दबावाखाली होते. ‘काला पत्थर’सह त्यांचे सलग काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते आणि आणखी एक अपयश परवडणारे नव्हते. सुरुवातीला त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चित्रपटात परवीन बाबी आणि स्मिता पाटील यांची निवड केली होती. मात्र, शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी यश चोप्रा यांनी दोन्ही अभिनेत्रींना रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी रेखा आणि जया बच्चन यांच्याशी संपर्क साधला.
रेखा यांनी ‘सिलसिला’मध्ये काम करण्यासाठी लगेच होकार दिला. मात्र, जया बच्चन या चित्रपटात काम करण्यास काहीशा अस्वस्थ होत्या. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यावेळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित प्रेमसंबंधांबाबतच्या चर्चा आणि त्यासंदर्भातील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या. अखेर संजीव कुमार यांनी मध्यस्थी करत जया बच्चन यांची मनधरणी केली आणि त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी तयार केलं.
स्मिता पाटील यांना होती पहिली पसंती
या घटनेची आठवण सांगताना पत्रकार हनीफ झवेरी यांनी म्हटलं, “सिलसिलाबद्दल चर्चा सुरू झाली, तेव्हा चित्रपटाची मूळ स्टारकास्ट स्मिता पाटील आणि परवीन बाबी अशी होती. मात्र, त्याच काळात परवीन बाबी यांना आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या होत्या. त्यामुळे यश चोप्रा यांना त्यांना चित्रपटातून काढावं लागलं. त्यानंतर त्यांनी स्मिता पाटील यांनाही चित्रपटातून काढलं”. ते पुढे म्हणाले, “यानंतर यश चोप्रा यांनी रेखा आणि जया बच्चन यांना चित्रपटात घेण्याचा विचार केला. रेखा यांनी आनंदाने चित्रपटासाठी होकार दिला, मात्र जया बच्चन तयार नव्हत्या. याबद्दल संजीव कुमार यांना समजलं तेव्हा त्यांनी जया बच्चन यांची मनधरणी केली आणि त्यांना चित्रपटासाठी होकार देण्यास तयार केलं.अखेर हा चित्रपट बनला”. संजीव कुमार जया बच्चन यांची मनधरणी का करू शकले, याबद्दल हनीफ यांनी सांगितलं की, गुलजार यांच्या ‘कोशिश’ चित्रपटात एकत्र काम करताना संजीव कुमार आणि जया बच्चन यांच्यात जवळचं नातं निर्माण झालं होतं.
संजीव कुमार जया बच्चन यांची मनधरणी का करू शकले, याबद्दल हनीफ यांनी सांगितलं की, गुलजार यांच्या ‘कोशिश’ चित्रपटात एकत्र काम करताना संजीव कुमार आणि जया बच्चन यांच्यात जवळचं नातं निर्माण झालं होतं. हनीफ यांनी सांगितलं, “गुलजार यांच्या कोशिश चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर जया बच्चन आणि संजीव कुमार यांच्यात खूप घट्ट नातं निर्माण झालं होतं. सुरुवातीला हा चित्रपट मौसमी चॅटर्जी यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, नंतर कोणत्या कारणामुळे हे त्यांनाच माहीत, त्यांची जागा जया बच्चन यांनी घेतली. जया आणि संजीव कुमार दोघांनीही या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला. याच चित्रपटासाठी संजीव कुमार यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.” ते पुढे म्हणाले, “या घट्ट नात्यामुळे संजीव कुमार जया बच्चन यांना आपली बहीण मानत होते आणि जया बच्चनही त्यांना राखी बांधत होत्या.”

जया बच्चन एका अटीवर ‘सिलसिला’मध्ये झाल्या सहभागी
यापूर्वी विकी लालवानीला दिलेल्या एका मुलाखतीत संजीव कुमार यांच्याबद्दल चर्चा करताना हनीफ आणि संजीव कुमार यांची भाची जिग्ना शाह यांनी, संजीव कुमार यांना यश चोप्रा यांना जया बच्चन यांना ‘सिलसिला’मध्ये काम करण्यासाठी तयार करण्यात कशी मदत केली, याची आठवण सांगितली. हनीफ यांनी सांगितलं, “यश चोप्रा यांना माहीत होतं की संजीव कुमार जया बच्चन यांना आपली बहीण मानतात. त्यामुळे त्यांनी संजीव कुमार यांना जया यांची मनधरणी करण्यास सांगितलं. जया बच्चन यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला, मात्र त्यासाठी एक अट ठेवली. त्यांनी सांगितलं की, ज्या वेळी त्यांची गरज नसेल, त्या वेळीही त्या सेटवर उपस्थित राहतील.”


जया यांनी ही अट का ठेवली, असं विचारलं असता हनीफ म्हणाले, “अर्थातच रेखामुळे.” ते पुढे म्हणाले, “अमिताभ आणि रेखा आधीच चित्रपटात होते आणि यश चोप्रा यांना जया बच्चन यांनी चित्रपटात काम करावं, अशी खूप इच्छा होती. मात्र, जया तयार नव्हत्या. अखेर संजीव कुमार यांनी त्यांची मनधरणी केली.”
