Jaya Bachchan Paparazzi Feud : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्या नेहमी त्यांची मतं ठामपणे मांडत असतात. त्यामुळे काही वेळा त्यांना टीकेचाही सामना करावा लागतो. अशातच आता त्यांनी त्यांचे पती अमिताभ बच्चन व नातू अगस्त्य नंदा यांच्याबद्दल सांगितलं आहे.
जया बच्चन यांनी त्यांचा नातू अगस्त्य नंदा जर या क्षेत्रात मोठं नाव कमावणार असेल, तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही, असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर माध्यमांनी घातलेल्या १५ वर्षांच्या बंदीबद्दलही भाष्य केलं आहे. बच्चन कुटुंबीयांचा अभिनय क्षेत्रातील वारसा आता अगस्त्य नंदा त्यांच्या घरातील तीन पिढ्या पुढे नेत आहेत. त्यामुळे अगस्त्यला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं आहे. अलीकडेच त्याची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
अगस्त्य नंदाच्या ‘इक्कीस’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये तो मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकला होता. लोकप्रिय दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी अगस्त्यने जोया अख्तरच्या ‘द अर्चिज’मधून बॉलीवडमध्ये पदार्पण केलेलं. त्यामुळे आता जया बच्चन त्यांच्या नातवाबद्दल नेमकं काय म्हणाल्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
अगस्त्य नंदाच्या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चिज’ आणि थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इक्कीस’ या चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जया बच्चन यांच्या माध्यमांबरोबर असलेल्या संबंधांमुळे लोकांनी या चित्रपटांना प्रतिसाद दिला नसल्याचं म्हटलं जात आहे. जया बच्चन यांनी आता त्यावर भाष्य केलं आहे. जया बच्चन म्हणाल्या, “या पृथ्वीवरील कुठलीही शक्ती माझ्या नातवाचं नशीब बदलू शकत नाही. जर अगस्त्य मोठा स्टार होणार असेल, तर त्याला कोणीच अडवू शकत नाही.”
जया बच्चन यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांचं उदाहरण दिलं आहे. जया बच्चन अमिताभ यांच्याबद्दल म्हणाल्या, “करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्यांना माध्यमांनी १५ वर्षांसाठी बॅन केलं होतं; पण म्हणून काही त्याचा त्यांच्या करिअरवर परिणाम झाला का?” पुढे माध्यमांशी असलेले त्यांचे संबंध आणि नातू अगस्त्य यांबद्दल त्या म्हणाल्या, “अगस्त्यचे माध्यमांबरोबर वेगळे संबंध असतील, त्याची त्यांच्याबरोबर वेगळी ओळखही असेल. या गोष्टीचं माझ्याशी काहीही घेणंदेणं नाही. माझे वाद वेगळे आहेत.”
काही दिवसांपूर्वी ‘बॉलीवूड हंगामा’शी संवाद साधताना जया यांनी अगस्त्य नंदाचं कौतुक केलं होतं. त्या म्हणालेल्या, “सुदैवानं अगस्त्य खूप पटकन गोष्टी आत्मसात करतो. नवीन गोष्टी शिकायला त्याला वेळ लागत नाही. त्याचे आई-वडील कलाकार नाहीयेत. त्यामुळे तो त्याच्या आजी-आजोबांवर आणि मामाकडून मार्गदर्शन घेतो. मी फार कोणाचं कौतुक करत नाही. अगदी माझ्या मुलांचं किंवा नातवंडांचंही नाही.”

