Jaya Bachchan Talks about Husband Amitabh Bachchan: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन स्पष्टवक्त्या आहेत. त्या त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. अलिकडेच, बरखा दत्तबरोबरच्या एका खास मुलाखतीदरम्यान जया यांनी पापाराझींबद्दल एक वक्तव्य केलं, त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या मुलाखतीत जया यांनी पती अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. प्रेमाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात. जया बच्चन यांच्यामते, त्या व अमिताभ बच्चन एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. “अमिताभ खूप शिस्तप्रिय आहेत आणि मीही खूप शिस्तप्रिय आहे. ते त्यांचे विचार लपवतात, पण मी माझे विचार, मतं जाहीरपणे व्यक्त करते. कदाचित म्हणूनच आमचा संसार चांगला चाललाय,” असं जया बच्चन म्हणाल्या.
“मला अमिताभ खूप आवडतात कारण ते खूप शांत आणि संयमी आहेत. मला त्यांची ही सवय खूप आवडते,” असं पतीबद्दल जया यांनी म्हटलं. अमिताभ बच्चन यांचा लग्नाबद्दल काय विचार आहे? असं जया यांना विचारण्यात आलं. यावर आपण कधीही विचारलं नाही, असं त्यांनी सांगितलं. “कदाचित ते म्हणतील की ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मला मात्र हे ऐकायचं नाही,” असं म्हणत जया बच्चन हसू लागल्या.
प्रेमाबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन?
अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली, तो क्षण आठवतो का? असं जया बच्चन यांना विचारण्यात आलं. “तुम्हाला जुन्या जखमा कशाला का आठवायच्या आहेत?” असं उत्तर जया बच्चन यांनी हसत दिलं. “मी त्यांच्याबरोबर ५२ वर्षांपासून संसार करतेय, यापेक्षा जास्त प्रेम मी त्यांच्यावर करू शकत नाही,” असं जया बच्चन यांनी नमूद केलं. जया यांनी पहिल्याच नजरेत अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली.

१९७१ मध्ये अभिनेत्री जया भादुरी फक्त २३ वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांनी ‘गुड्डी’ आणि ‘उफार’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे सिनेमे हिट झाले आणि त्या खूप लोकप्रिय झाल्या. त्यांना विशेष फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. जया यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने केवळ लोकप्रियताच नाही तर आयुष्यभराचे प्रेमही मिळवून दिले.
‘गुड्डी’ च्या सेटवर एका छोट्या कॅमिओसाठी आलेल्या अमिताभ बच्चन यांच्याशी जया बच्चन यांची भेट झाली. बिग बींनी तेव्हा इतर चित्रपटांमध्ये काम केले होते, पण जया तेव्हा मोठ्या स्टार होत्या. नंतर अमिताभ बच्चन व जया यांनी ‘जंजीर’ (१९७३) या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं आणि ते डेटिंग करू लागले. अमिताभ बच्चन लंडनमध्ये जयाबरोबर या चित्रपटाचं यश साजरं करण्याचा प्लॅन करत होते. पण हरिवंशराय बच्चन म्हणाले की त्यांना आधी लग्न करावं लागेल, नाहीतर जाता येणार नाही. मग जया व अमिताभ बच्चन यांनी अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
