ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी अनेकदा त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील आव्हानांवर मोकळेपणाने भाष्य केलं आहे. अभिनेत्याबरोबर लग्न करणं ही आयुष्यातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे, अभिनेता अरशद वारसीची पत्नी मारिया गोरेटी हिलादेखील जया बच्चन यांनी असाच सल्ला दिला होता.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरशद वारसीने हा किस्सा सांगितला. लग्नाआधी जया बच्चन यांनी मारिया यांना अभिनयक्षेत्रात काही अशा गोष्टींची मागणी असते, ज्या सामान्य आयुष्यात पाहायला मिळत नाहीत असं सांगत सावध केलं होतं. फिल्मी ग्यानला दिलेल्या मुलाखतीत अरशद वारसीने याबद्दल सांगितलं आहे.
जया बच्चन यांनी दिलेला सल्ला
जया बच्चन यांनी दिलेला सल्ला आठवत. तो म्हणाला, “जया खूप हुशार स्त्री आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं, आयुष्यातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे अभिनेत्याबरोबर लग्न करणं. मी असं म्हणणार नाही की अभिनेत्यांचा स्वभावच तसा असतो. पण दुर्दैवाने, तुमच्यासमोर नेहमी अशा परिस्थिती निर्माण होतात, जिथे तुम्ही अतिशय रंजक आणि खूप सुंदर दिसणाऱ्या लोकांबरोबर वेळ घालवत असता.”
अरशद वारसी पुढे म्हणाला, “जया यांनी खरंच मला सांगितलं होतं. जेव्हा माझं आणि मारियाचं लग्न होणार होतं, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आयुष्यातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे अभिनेत्याबरोबर लग्न करणं. त्यांनी आम्हाला विचारलं होतं, तुम्ही यासाठी तयार आहात का? कारण तुमचं काम तुम्हाला अशा काही गोष्टी करायला भाग पाडतं, ज्या सामान्य जोडप्यांच्या आयुष्यात घडत नाहीत. त्यामुळे त्या मर्यादा ओलांडूनही तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर नातं टिकवावं लागतं. तुमचं प्रेम हे सामान्य लोकांच्या प्रेमापेक्षा अधिक भक्कम असायला हवं.”
अर्शद-मरियाचं आंतरधर्मीय लग्न
अरशद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांनी याआधी त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दलही भाष्य केलं आहे. मारिया यांच्या कॅथलिक आई-वडिलांना आपल्या मुलीने मुस्लीम अभिनेत्याशी लग्न करण्याबाबत सुरुवातीला संकोच वाटत होता. अरशदने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, “ते थोडे घाबरले होते. कॅथलिक मुलगी आणि मुस्लीम मुलगा. ते दोघेही खूप साधे आहेत. त्यांच्या आयुष्यात येशू ख्रिस्तशिवाय दुसरं काहीच नाही”.
अरशद वारसी पुढे म्हणाला, “ते थोडे घाबरले होते. कारण मारियाने एखाद्या कॅथलिक मुलाशी लग्न करावं, जो सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी नोकरी करेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण तिने एका मुस्लीम मुलाला पसंत केलं आणि तोही त्यावेळी बेरोजगार होता.”
