Jaya Janaki Nayaka Movie Record: काही सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात; मात्र कालांतराने अशा सिनेमांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळताना दिसते. या यादीत २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका सिनेमाचा समावेश आहे. आता या सिनेमाचे नाव काय आहे, सिनेमात कोणकोणते कलाकार होते, याबद्दल जाणून घेऊयात…
२०१७ मध्ये जया जानकी नायक हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि बेलमकोंडा साई श्रीनिवास यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र, त्यावेळी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉफ ठरला होता. आता मात्र हा सिनेमा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे जया जानकी नायक या सिनेमाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.
९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘हा’ सिनेमा ठरलेला फ्लॉप
हा भारतीय चित्रपट यूट्यूबवर एक अब्ज व्ह्युजचा टप्पा गाठणारा जगातील पहिला चित्रपट ठरला आहे. PSY च्या ‘गंगनम स्टाईल’ म्युझिक व्हिडीओने हा टप्पा सर्वप्रथम ओलांडला आहे. मात्र, चित्रपटांच्या बाबतीत ‘जया जानकी नायक’च्या नावावर हा विक्रम आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार हा चित्रपट ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला होता आणि त्याने जगभरात २० कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, यूट्यूबवर या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि हा सिनेमा हिट झाला. तेलुगु भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे नाव ‘जया जानकी नायक’; तर हिंदी आवृत्तीचे नाव ‘खुंखार’ होते. सात वर्षांपूर्वी हिंदीमध्ये डब केलेला सिनेमा प्रदर्शित केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन बोयापती श्रीनू यांनी केले होते. बोयापती श्रीनू यांनी चित्रपटाने एक अब्ज व्ह्युजचा विक्रम केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, “१ बिलीव्ह व्ह्युज. १००० दशलक्ष मने. १ अब्ज भावना. १ चित्रपट. हा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”
अल्लू अर्जुनचा ‘सराइनोडू'(Sarrainodu) हा चित्रपट हा विक्रम करणारा पहिला चित्रपट ठरू शकला असता. मात्र, या चित्रपटाची हिंदी आवृत्ती, जिला लाखो व्ह्युज मिळाले होते, ती डिलीट करून पुन्हा अपलोड करण्यात आली.
कामाच्या आघाडीवर असताना दिग्दर्शक श्रीनू यांनी ‘अखंड 2’ दिग्दर्शित केला. रकुल प्रीत सिंग नुकतीच ‘पति पत्नी और वो दो’मध्ये दिसली होती. या चित्रपटात आयुष्मान खुराना, वामिक गब्बी व सारा अली खान यांच्याही भूमिका आहेत.
