Sridevi Jaya Prada Rivalry: ८० च्या दशकात जया प्रदा आणि श्रीदेवी बॉलीवूडच्या सर्वात आघाडीच्या अभिनेत्री होत्या. दोघींनी एकत्र अनेक सुपरहिट सिनेमे दिले, पण पडद्यावर हिट झालेल्या या दोन अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात कधीच मैत्री झाली नाही. जया प्रदा यांनी स्वतः कबूल केलं होतं की श्रीदेवीबरोबर त्यांचं क्वचितच बोलणं व्हायचं. अगदी जितेंद्र आणि राजेश खन्ना यांनी केलेल्या प्रयत्नानंतरही त्यांच्यातला अबोला दूर झाला नाही.
२०२१ मध्ये ‘इंडियन आयडॉल १२’ या शोमध्ये जया प्रदा आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी श्रीदेवीबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल सांगितलं होतं. दोघींनी अनेक सुपरहिट सिनेमे एकत्र केले, पण त्यांच्यात कधीही भावनिक नातं निर्माण होऊ शकलं नाही आणि त्या नेहमी एकमेकींच्या स्पर्धक राहिल्या.
जया प्रदा म्हणाल्या, “मी नशीबवान होते की मला श्रीदेवीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण आम्ही कधी एकमेकींच्या डोळ्यात पाहून बोलायचो नाही. पडद्यावर जरी आम्ही सख्ख्या बहिणींची भूमिका करायचो, तरी खऱ्या आयुष्यात आमच्यात स्पर्धा असायची. कपडे असोत की डान्स, प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असायची. सेटवर भेटल्यावर जेव्हा दिग्दर्शक किंवा इतर कलाकार आमची ओळख करून द्यायचे, तेव्हा आम्ही फक्त ‘नमस्कार’ करायचो आणि पुढे निघून जायचो.”
जया प्रदा व श्रीदेवी यांचे चित्रपट
जया प्रदा आणि श्रीदेवी दोघींनीही आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांतून केली होती. नंतर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही यश मिळवलं. त्यांनी ‘देवता’, ‘तोहफा’, ‘मवाली’, ‘मकसद’, ‘औलाद’, ‘नया कदम’, ‘मैं तेरा दुश्मन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ८० च्या दशकात त्यांची जोडी बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक होती.
जितेंद्र व राजेश खन्नांनी जया प्रदा-श्रीदेवीला खोलीत बंद केलं होतं
जया प्रदा यांनी ‘मकसद’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्साही सांगितला. जितेंद्र आणि राजेश खन्ना यांची इच्छा होती की या दोन्ही अभिनेत्रींनी एकमेकींशी मैत्री करावी. यासाठी त्यांनी दोघींना एका मेकअप रूममध्ये तासाभरासाठी बंद केलं होतं. जया प्रदा म्हणाल्या, “मला आजही आठवतंय, ‘मकसद’च्या शूटिंगदरम्यान जीतू जी आणि राजेश खन्ना जी यांनी आम्हाला एका मेकअप रूममध्ये तासाभरासाठी बंद केलं होतं. त्यांना वाटलं होतं की आम्ही एकमेकींशी बोलू, पण तासाभरात आम्ही एकमेकींशी एक शब्दही बोललो नाही. शेवटी या दोन्ही बॉलीवूड सुपरस्टार्सनीही हार मानली.”
श्रीदेवींच्या आठवणीत भावुक झाल्या जया प्रदा
फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईत श्रीदेवीचे निधन झाले. त्यावेळी जया प्रदा भावुक झाल्या होत्या. एवढी वर्षे एकत्र काम करूनही त्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही, या गोष्टीची आजही खंत वाटत असल्याची कबुली त्यांनी दिली होती. त्या म्हणाल्या, “आजही त्या गोष्टीची मला खंत वाटते. मी त्यांना खूप मिस करते, कारण आता मला एकटेपणा जाणवतो.”
