‘कॉकटेल’ या चित्रपटानंतर दीपिका पदुकोणच्या करिअरला मोठं वळण मिळालं. त्यानंतर तिला संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. भन्साळींबरोबरचा हा तिचा पहिलाच चित्रपट होता. पुढे तिने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांमध्येही एकत्र काम केलं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री जयती भाटिया यांनी ‘राम-लीला’मधील भूमिकेच्या तयारीदरम्यान दीपिकाबरोबर काम केल्याच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटासाठी दीपिकाला तिच्या व्यक्तिरेखेची तयारी करून देण्यासाठी भन्साळींच्या टीमने जयती यांची निवड केली होती. यावेळी दीपिका कामाबाबत अत्यंत समर्पित होती आणि कमी वेळेतच तिने सगळं शिकून घेतल्याचा खुलासा त्यांनी केला.

जयती यांनी सांगितला दीपिकाबरोबर काम करण्याचा अनुभव

जयती भाटिया यांनी सांगितलं की, दीपिका पदुकोणसाठी सात दिवसांच्या अभिनय कार्यशाळेचं नियोजन करण्यात आलं होतं आणि दररोज चार तास सराव होणार होता. याबद्दल जयती म्हणाल्या, “मी तिच्याबरोबर काम सुरू केलं तेव्हा ती पूर्ण समर्पणाने आणि प्रचंड ऊर्जेने प्रत्येक गोष्ट करत होती. सात दिवस, दररोज चार तास तिच्याबरोबर काम करायचं होतं. पण चौथ्या दिवसानंतर मी भन्साळी सरांना सांगितलं, सर, कॉकटेलनंतर ती एक निर्भीड अभिनेत्री बनली आहे. तो तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. आता आणखी तीन दिवस तिच्याबरोबर काम केलं तर तिचा आणि तुमचाही वेळ वाया जाईल. तिला थेट शूटिंगला घेऊन जा. तुम्ही जे सांगाल ते ती करेल. ती स्वतःला भूमिकेनुसार घडवून घेणारी आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी कायम तयार असलेली अभिनेत्री आहे.”

जयती भाटिया यांनी कार्यशाळेदरम्यानचा आणखी एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की, दीपिकामधील संकोच दूर करून कॅमेऱ्यासमोर तिला अधिक मोकळेपणाने वावरता यावं, यासाठी त्यांनी एक खास सराव घेतला होता. या सरावात दीपिकाला मनमोकळेपणाने शिवीगाळ करायची होती, जेणेकरून तिचा संकोच दूर होईल आणि ती अधिक सहजपणे भूमिका साकारू शकेल.

दीपिका पादुकोणने केलेली शिवीगाळ

जयती भाटिया यांनी त्या कार्यशाळेतील आणखी एक रंजक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “भन्साळी यांच्या ऑफिसला एक बाल्कनी होती आणि खाली एक विक्रेता बसायचा. मी दीपिकाला सांगितलं, तुझा आजचा सराव म्हणजे त्या बाल्कनीत उभं राहून मोठ्याने शिवीगाळ करायची. खाली पाहायचं नाही, तर समोर एखादी व्यक्ती उभी आहे असं समजून बोलायच. आम्ही एका तयारी करत होतो. हा सराव दीपिकाला मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करता याव्या यासाठी होता. तिने दार उघडलं आणि मोठ्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. ज्या मी स्वतः कधी ऐकल्या नव्हत्या. तिने जे काही ऐकलं होतं, ते सगळं त्यावेळी वापरलं. ते पाहून मी फक्त ‘व्वा!’ एवढंच म्हणाले.” जयती यांनी पुढे सांगितलं, “कोणी आपल्याकडे पाहत असेल किंवा काय विचार करेल, याचा दीपिकाला अजिबात संकोच नव्हता. ती तेव्हाही मोठी स्टार होती, लोक तिला ओळखत होते. तरीही तिने कोणतीही भीती न बाळगता हा सराव पूर्ण केला.”

जयती म्हणाल्या, “मी स्वतः शिवीगाळ करत नाही. त्यामुळे हा सराव माझ्यासाठीही एक आव्हानच होता. म्हणून मी आधी दीपिकासमोर स्वतः तो करून दाखवला, जेणेकरून ती माझं अनुकरण करत मोकळेपणाने तो सराव करू शकेल.” जयती भाटिया यांनी कार्यशाळेदरम्यान दीपिका पदुकोणसोबत झालेल्या पहिल्या भेटीचीही आठवण सांगितली. त्या म्हणाल्या की, सुरुवातीला दीपिकाला ‘राम-लीला’मध्ये आपण एक शांत, सोज्वळ (सब्लाइम) व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं वाटत होतं. याबद्दल जयती म्हणाल्या, “मी भन्साळी सरांना सांगितलं की, दीपिकाला वाटतंय तुम्ही तिला एक शांत आणि सोज्वळ भूमिका दिली आहे. त्यावर ते म्हणाले, “तिला मोठा धक्का बसणार आहे.’ राम-लीलामध्ये दीपिकाची व्यक्तिरेखा अत्यंत भावनिक, धाडसी आणि तडक-भडक स्वभावाच्या मुलीची होती.”

जयती भाटिया यांनी सांगितलं की, त्या काळात दीपिका पदुकोण नैराश्याशी (डिप्रेशन) झुंज देत होती, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. कारण दीपिकाने कामादरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील कोणतीही अडचण समोर येऊ दिली नाही. याबद्दल जयती म्हणाल्या, “त्या वेळी दीपिका डिप्रेशनमधून जात होती, हे मला माहीत नव्हतं आणि तिनेही मला त्याची जाणीव होऊ दिली नाही. मला ते का समजलं नाही? कारण त्या चार तासांच्या कार्यशाळेत ती स्वतःचं शंभर टक्के योगदान द्यायची. मी जे काही सांगायचे ते ती मनापासून करायची, इतकंच नाही तर अपेक्षेपेक्षाही अधिक करून दाखवायची.”