Jennifer Winget First Husband: कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत येतात. त्यांची रिलेशनशिप, त्यांचे नातेसंबंध यांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. आपल्या आवडत्या कलाकारांचे जवळचे मित्र कोण आहेत, ते कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे लग्न कोणाबरोबर झाले आहे, त्यांचे जोडीदार काय काम करतात अशा अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचे असते.

कलाकार विविध मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांबरोबर बरीच माहिती मिळते. आता लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सिंगापूरमधील एका व्यावसायिकाशी ती लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. जेनिफरचे पहिले लग्न कोणाबरोबर झाले होते, हे तुम्हाला माहीत आहे का?

जेनिफर विंगेटचा पहिला पती आहे ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

जेनिफर विंगेटने एका लोकप्रिय अभिनेत्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून, करणसिंह ग्रोव्हर हा आहे. ‘दिल मिल गए’च्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. ही मालिका लोकप्रिय ठरली होती. करण व जेनिफरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. याच मालिकेच्या सेटवर त्यांच्यात जवळीक वाढली. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले; पण हे लग्न फक्त दोन वर्षे टिकले आणि २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करणचे जेनिफरसोबतचे हे दुसरे लग्न होते.

घटस्फोटानंतर अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती की, यात आमच्या दोघांचीही चूक नव्हती. जे व्हायचं होतं ते झालं. जेनिफरपासून वेगळे झाल्यानंतर करणने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूबरोबर लग्न केले. करण व बिपाशा यांनी अलोन या सिनेमात एकत्र काम केले. त्यावेळीच त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू होत्या. २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना २०२२ मध्ये मुलगी झाली. तिचे नाव देवी, असे आहे. बिपाशा अनेकदा सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करते. या फोटोंमध्ये तिच्या कुटुंबाची, तिच्या मुलगीची झलक पाहायला मिळते.

जेनिफरच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलायचे तर विल्यम इश्माएल (William Ishmael), असे त्याचे नाव आहे. विल्यम इश्माएल हा सिंगापूरमधील व्यावसायिक आहे. ते काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अभिनेत्रीच्या एका जवळच्या व्यक्तीने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधला. त्यावेळी जेनिफर व विल्यम सध्या लग्नाचे प्लॅनिंग करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा डिसेंबर-जानेवारीमध्ये हे लग्न होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता जेनिफर स्वत: याबद्दल कधी सांगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.