Jim Sarbh on Sonam Kapoor: अभिनेता जिम सरभने ओटीटीबरोबरच बॉलीवूड सिनेमांतही काम केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याला इंडस्ट्रीमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.
जिम सरभने नीरजा या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. राम माधवानी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा २०१६ ला प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री सोनम कपूर सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिने नीरजा भनोटची भूमिका साकारली होती. तर जिमने सिनेमात दहशतवाद्याची भूमिका साकारली होती.
“माझ्या हातून काय झालं…”
‘हॉलीवूड रिपोर्टर ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने नीरजाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अपघात झाला होता, असा खुलासा केला. तो म्हणाला, “हातातील बंदूक चुकून सोनम कपूरच्या तोंडाला लागली. माझ्या हातून काय झालं, असं मला वाटलं. त्यावेळी मी खूप गोंधळलो. तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. पण, तिने त्या गोष्टी खिलाडू वृत्तीने घेतल्या. “
पुढे तो म्हणाला, “मी जे काही करत होतो, त्याचा सगळेजण आनंद घेत होते.सुदैवाने मला माझ्या पहिल्या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं नाही. नाहीतर आज मी इथे नसतो.”
याच मुलाखतीत अभिनेत्याने वेगवेगळ्या सिनेमांतील भूमिकांबद्दलही सांगितले. तसेच काम करण्याचा अनुभवही सांगितला. त्याने डेथ इन गुंज, पद्मावत, संजू, गंगुबाई काठियावाडी, मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे यांसारख्या सिनेमात काम केले आहे. तसेच, त्याने मेड इन हेव्हन, रॉकेट बॉईज, फोर मोअर शॉटस प्लीज, मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी यांसारख्या सीरिजमध्येही काम केले आहे.
