Biopics To Watch : बॉलिवूड असो किंवा दक्षिणात्य चित्रपटसृष्टी, चरित्रपटांना प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान असतं. या चित्रपटांमधून केवळ मनोरंजनच नाही, तर यश मिळवण्यासाठी केलेला संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवासही पाहायला मिळतो. जर तुम्हालाही सत्य घटनांवर आणि वास्तविक व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आवडत असतील, तर जिओ हॉटस्टारवरील हे दमदार बायोपिक चित्रपट नक्की पाहा. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांना आयएमडीबीवर चांगले रेटिंग मिळाले आहे.

12th Fail – हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. एका गरीब कुटुंबातील मुलगा अनेक अडचणींवर मात करत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करतो, याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात दाखवली आहे. विक्रांत मॅस्सीने केलेला दमदार अभिनय आणि प्रभावी कथा यामुळे हा चित्रपट अनेकांना आवडला आणि ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर आपण हा थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा होता अशी खंतही अनेकांनी सोशल मीडियामार्फत व्यक्त केली. तर आयएमडीबीवर या चित्रपटाला ८.९ रेटिंग आहे.

एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. छोट्या शहरातून आलेल्या धोनीने मेहनत, जिद्द आणि स्वप्नांच्या जोरावर क्रिकेटविश्वात मोठं नाव कसं कमावलं, याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतने यात मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयामुळे आणि भावनिक कथेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. आयएमडीबीवर या चित्रपट ८ रेटिंग आहे.

रॉकेट्री : द नांबी इफेक्ट – हा चित्रपट भारतीय शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्या आयुष्यावर आधारित आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये त्यांनी दिलेले महत्त्वाचे योगदान, त्यांच्यावर झालेले खोटे आरोप आणि त्या काळातील संघर्ष याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. आर.माधवनने या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला असून त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.६ इतकं रेटिंग आहे.

सुपर ३० – हा चित्रपट प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शिक्षणाच्या बळावर आयुष्य बदलू शकतं, हा संदेश देणारी ही प्रेरणादायी कथा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना IIT पर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका शिक्षकाचा संघर्ष आणि जिद्द या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ह्रतिक रोशनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून त्याच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक झालं. आयएमडीबीवर याला ८.० इतकं रेटिंग आहे.

पान सिंग तोमर – हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावरील धावपटू पान सिंग तोमर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. एका यशस्वी खेळाडूचा प्रवास परिस्थितीमुळे बंडखोर बनण्यापर्यंत कसा पोहोचतो, हे या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. समाजव्यवस्था आणि अन्यायामुळे एका खेळाडूला दरोडेखोर बनणावं लागलं. दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी साकारलेली दमदार भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हा चित्रपट अधिक प्रभावी ठरतो. आयएमडीबीवर चित्रपटाला ८.३ इतकं रेटिंग आहे.

कौन प्रवीण तांबे? – हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित आहे. बहुतांश खेळाडू निवृत्तीचा विचार करतात त्या वयात प्रवीण तांबे यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा दिली आणि मोठं यश मिळवलं. जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा संदेश देणारी ही कथा प्रेक्षकांना प्रेरणा देते. या चित्रपटाला ८.३ इतकी रेटिंग आहे.