Jodha Akbar fame Rajat Tokas has disappeared from the limelight : मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाने अनेकांची पसंती मिळवली होती पण, कालंतराने ते लाईमलाईटपासून अचानक दूर गेले. यापैकीच एक अभिनेता म्हणजे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘जोधा अकबर’मधील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रजत टोकस.

रजत टोकस जोधा अक्बर या मालिकेतील त्याच्या अकबर या भूमिकेमुळे घराघरात पोहोचला. त्याने त्याच्या अभिनयाने यामधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केलं पण खऱ्या अर्थाने त्याला लोकप्रियता मिळाली ते एकता कपूरच्या ‘जोधा अकबर’ या मालिकेमुळेच. या मालिकेतील त्याची व अभिनेत्री परिधी शर्माची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली. मात्र एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेला अभिनेता गेला बराच काळ अभिनेता लाईमलाईटपासून दूर असल्याचं समोर आलं आहे.

आज तकच्या माहितीनुसार रजतने फार कमी काळात लोकप्रियता मिळवली होती. परंतु, त्याने लग्नानंतर कमी करणं पसंत केलं आणि हळूहळू तो लाईमलाईटपासून दूर गेला. आज तो कुठे आहे याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असली तरी त्याच्या कोणी सहकलाकारही त्याच्या संपर्कात नाहीये. त्याने २०२४मध्ये शेवटची इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती.

‘जोधा अकबर’मधील या मालिकेत अनेक कलाकारांनी रजत टोकसबरोबर काम केलं होतं. मात्र, आता त्या कलाकारांपैकी फार कमी लोक त्याच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. अलीकडेच मालिकेत बेगम रुकैया ही भूमिका साकारणाऱ्या लवीना टंडन Lavina Tandonने रजत टोकस आणि परिधी शर्माबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, एकेकाळी तिच्याकडे परिधी शर्माचा नंबर होता. मात्र, रजत टोकसबरोबर तिचं कधीच फारसं बोलणं झालं नाही. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “माझ्याकडे कधीच रजतचा फोन नंबर नव्हता आणि त्याच्याशी कधी फार बोलणं व्हायचं नाही. पण तो खूप व्यावसायिक आणि चांगला अभिनेता आहे.”

‘जोधा अकबर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता रजत टोकस शेवटचा एकता कपूरच्याच ‘नागीन ३’ मालिकेत झळकलेला. दरम्यान त्याची पत्नी सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि तिने शेवटचं २०२५मध्ये त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. रजतच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टखाली त्याचे चाहते त्याला कमेंटमार्फत ते पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणताना दिसत आहेत.