मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी मिळेल ते काम करुन दिवस काढले आहेत. कोणाचाही आधार नसताना केवळ कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. यापैकीच एक म्हणजे लोकप्रिय बॉलीवूड अभिनेते जॉनी लिव्हर.
जॉनी लिव्हर यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांनी अवघ्या लहान वयातच अनेक गोष्टींचा सामना केला. आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगने अनेकांना खळखळून हसवणारे जॉनी लिव्हर यांनी एकदा गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं होतं. जॉन प्रकाश राव जनुमाला या नावाने जन्मलेल्या आणि मुंबईतील धारावी परिसरात वाढलेल्या जॉनी लिव्हर यांना अगदी लहान वयातच आयुष्यातील कठीण आव्हानांचा सामना करावा लागला. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता बनण्याच्या खूप आधीपासूनच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आणि काही परिस्थितींमुळे ते स्वतःला असहाय्यही समजत होते.
आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत जॉनी लिव्हर यांनी दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांबरोबरचं बालपण आणि आर्थिक अडचणींबद्दल सांगितलं होतं. अवघ्या १३व्या वर्षी परिस्थितीचा ताण इतका वाढला होता की, जॉनी लिव्हर यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळांवर जाण्याचा निर्णय घेतला होता. असंही म्हटलं जातं. मात्र, त्याच वेळी त्यांना त्यांच्या बहिणीची आठवण झाली आणि आपल्या कुटुंबाला आपली किती गरज आहे, याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेतला.
लहानपणी पाहिल्या अनेक हिंसक घटना
जॉनी लिव्हर यांनी धारावीमध्ये लहानाचं मोठं होत असताना पाहिलेल्या भयावह हिंसाचाराच्या घटनांचाही यावेळी उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात परिसरात मृतदेह दिसणं किंवा हिंसक घटना घडणं ही काही असामान्य बाब नव्हती. लहानपणी पाहिलेल्या या घटनांबद्दल सांगताना जॉनी लिव्हर म्हणाले, “धारावीत आम्ही दररोज खून होताना पाहायचो. कधी रस्त्याच्या कडेला एखाद्याचा मृतदेह पडलेला असायचा, तर कधी कोणीतरी एखाद्याची हत्या करून मृतदेह तिथे फेकून दिलेला असायचा. ज्या रस्त्यावर आम्ही हे सगळं नेहमी पाहायचो, त्याच रस्त्यावरून आम्ही शाळेत जायचो”.
लहानपणीच्या या भयावह आठवणी आणि पडद्यावर नंतर प्रेक्षकांना भावलेलं जॉनी लिव्हर यांचं हसतमुख, उत्साही आणि विनोदी व्यक्तिमत्त्व यांच्यात कमालीची तफावत पाहायला मिळते.
