Johnny Lever Struggle Story : जॉनी लिव्हर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी हिंदीसह इतर भाषेतही काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं आतापर्यंत अनेकांना पोट धरून हसवलं आहे. विविध भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.

जॉनी लिव्हर हे बॉलीवूडमधील मोठं नाव आहे. अनेकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का इथपर्यंत येण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मुंबईतील धारावीमध्ये लहानाचे मोठे झालेले जॉनी लिव्हर एकेकाळी रस्त्यावर पेन विकायचे. पण, आज त्यांचं मुंबईत आलिशान घर आहे. नशीबही बदलू शकतं फक्त तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद हवी असं म्हणतात ते जॉनी लिव्हर यांच्याबरोबर घडलं आहे.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार जॉन प्रकाश राव जानुमाला म्हणजेच जॉनीलिव्हर यांचा जन्म मुंबईतील तेलुगू ख्रिस्ती घरात झालेला. मुंबईतील धारावीमध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यांना लहानपणापासून आर्थिक संघर्षाला सामोरं जावं लागलं. सातवीत असताना आर्थिक अडचणींमुळे त्यांना शाळेतून काढण्यात आलं. जॉनी लिव्हर मुंबईच्या रस्त्यांवर पेन विकायचे. ते करत असातना बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांची ते मिमिक्री करायचे. बॉलीवूड चित्रपटात एन्ट्री होण्याआधी ते अनेक स्टेज शो आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचे. जिकडे त्यांच्या मिमिक्रीमुळे त्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं. त्यावेळीच त्यांना त्यांचं जॉनी लिव्हर हे टोपननाव मिळालं.

Award Banner

‘हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये काम करत असताना सुनील दत्त यांनी त्यांना पाहिलं आणि जॉनी यांना पहिला ब्रेक मिळाला. त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. जॉनी लिव्हर यांनी त्यानंतर बॉलीवूडमधील बड्या कलाकारांसह काम केलं आहे. त्यांनी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. तर त्यांनी ‘बाजीगर’, ‘करण अर्जुन’, ‘दुल्हे राजा’, ‘दे दना दन’ यांसारख्या चित्रपटांत काम करत घराघरात पोहोचले.

धारावीच्या रस्त्यांवर पेन विकण्यापासून ते मुंबईतील लोखंडवाला सारख्या महागड्या परिसरात स्वत:चं घर खरेदी करेपर्यंतचा प्रवास जॉनी लिव्हर यांनी गाठला आहे. आता ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर ड्युप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. शिवाय बॉलीवूडमध्येही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.