Nasir Khan on father Johnny Walker: लोकप्रिय अभिनेते जॉनी वॉकर हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. आता नुकतीच त्यांचा मुलगा नासिर खान यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वडील जॉनी वॉकर यांच्या संघर्षाबद्दलची माहिती दिली. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली.

“माझ्या वडिलांनी खूप कमी वयात…”

विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या बालपणाबद्दल बोलताना नासिर यांनी सांगितले की, त्यांचे आजोबा हे सुरुवातीला गिरणीत मॅनेजर म्हणून काम करायचे. मात्र, त्यांची नोकरी गेल्यानंतर कुटुंबाची परिस्थिती बदलली. त्यांच्यावर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी असल्याने ते सतत कामाच्या शोधात फिरतीवर असायचे. आजोबांना स्थिर नोकरी मिळत नसल्याने माझ्या वडिलांनी खूप कमी वयात पैसे कमवायला सुरुवात केली.

नासिर पुढे म्हणाले, “डॅडींनी वयाच्या १२-१३ व्या वर्षी शाळा सोडली आणि काम करायला सुरुवात केली. त्यांनी सायकलीवरून फळे आणि आईस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. ‘मी काहीतरी केले पाहिजे. मी काही पैसे कमावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून संपूर्ण कुटुंबाला दररोज दोन वेळचे व्यवस्थित जेवण मिळू शकेल, असा विचार त्यांनी केला. त्यांनी आईस्क्रीम विकण्याबरोबरच पतंगाची दोरी विकणे, सायकलीच्या दुकानात काम करणे, फळे विकणे आणि इतकेच नाही, तर यात्रेत घोषणा देणे, अशा स्वरूपाची कामे केली. असे क्वचितच एखादे काम असेल, जे डॅडींनी केले नसेल.”

नासिर यांनी पुढे सांगितले की, त्यांचे कुटुंब मुंबईत पोहोचण्याआधी स्थिरतेच्या शोधात सतत भटकत राहिले. अखेर मुंबईत आल्यानंतर वॉकर यांना बेस्ट बस कंडक्टर म्हणून नोकरी मिळाली.

नासिर यांनी, “जेव्हा वडील जवळपास १४-१५ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या डाव्या डोळ्याला काहीतरी त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांना डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप्स दिले आणि त्यांना १०-१५ दिवसांनंतर परत बोलावले. जेव्हा ते परत गेले तेव्हा डॉक्टर जागेवर नव्हते; तेथे फक्त एक कम्पाउंडर होता. त्या कम्पाउंडरने चुकून डॅडींच्या डोळ्यात कानाचे ड्रॉप्स टाकले. त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी कमी झाली. त्यांना डाव्या डोळ्याने फक्त ३० ते ४० टक्केच दिसायचे आणि वयाबरोबर त्यांची दृष्टी अधिकाधिक कमी होत गेली”, असे म्हटले. त्यांचे चित्रपट पाहून तुमच्या हे कधीच लक्षात येणार नाही. कारण- त्यांना ही समस्या असल्याचे तुम्हाला कधीच कळले नसते. त्याबद्दल कोणालाच माहीत नव्हते, असेही नासिर यांनी स्पष्ट केले.

बेस्ट कंडक्टर म्हणून काम करताना बॉलीवूडमध्ये मिळाली संधी

बस कंडक्टर म्हणून काम करताना बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. असे सांगितले जाते की, अभिनेते बलराज सहानी यांना ते विनोदी अभिनेते म्हणून उत्तमपणे काम करू शकतील, असे वाटले. त्यांनी त्यांची गुरू दत्त यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर वॉकर यांना ‘बाजी’ चित्रपटात कामाची संधी मिळाली आणि त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. जॉनी वॉकर यांनी पुढे ‘प्यासा’, ‘सीआयडी’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ व ‘मधुमती’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. जॉनी वॉकर यांचा अभिनय आणि त्यांनी काम केलेली गाणी ही अनेक क्लासिक हिंदी चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत.