Juhi Chawla Life Unknown Facts: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावलाने कायमच तिचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीच्या झोतातून दूर ठेवले. अब्जाधीश उद्योगपती आणि ‘मेहता ग्रुप’चे सर्वेसर्वा जय मेहता यांच्याशी जुहीचे लग्न झाले असले तरी या लग्नामागे एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक कहाणी दडली आहे. लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी २,००० पाहुण्यांची उपस्थिती असलेला भव्य सोहळा अचानक रद्द का करावा लागला, याबद्दल जुहीने स्वतः एका कार्यक्रमात खुलासा केला होता. आयुष्यातील कठीण प्रसंगात तिच्या सासूबाईंनी सर्वांच्या विरोधात जाऊन जो निर्णय घेतला, त्याने जुहीचे आयुष्य बदलून टाकले.

राकेश रोशन यांनी जुही आणि जय यांची ओळख करून दिली होती. पुढे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. २०२४ मध्ये ‘गुजरात चेंबर ऑफॅ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या एका कार्यक्रमात जुहीने तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. सुरुवातीला जवळपास २,००० पाहुण्यांच्या उपस्थितीत एक अतिशय भव्य विवाह सोहळा आयोजित करायचं ठरलं होतं. मात्र, लग्नाच्या एक वर्षापूर्वीच जुहीच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे ती प्रचंड भावनिक तणावातून जात होती, त्यामुळे तिला असा भव्य सोहळा करायचा नव्हता.

juhi-chawla-jay-mehta-wedding-mother-in-law-secret-love-story
जुही चावला (फोटो- इन्स्टाग्राम)

जुही चावलाच्या आईचं निधन आणि करिअर संपण्याची भीती

जुहीने त्यावेळी कबुल केलं होतं की, लग्न केल्याने करिअर संपेल अशी भीती तिला वाटत होती. एकूणच ती गोंधळलेली व मानसिक दडपणात होती. ती म्हणाली, “त्यावेळी मी माझ्या करिअरमधील काही खूप मोठ्या चित्रपटांचं शूटिंग करत होते आणि त्याच काळात माझं लग्न होतं. वर्षापूर्वी माझ्या आईचं निधन झालं होतं. जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती, तसा माझ्या मनात विचार आला की माझं जिच्यावर सर्वात जास्त प्रेम होतं, ती माझी आई आता नाहीये आणि आता माझं करिअरही संपेल. अशा परिस्थितीत आनंदी कसं राहावं हेच मला समजत नव्हतं. त्यामुळे एक दिवस मी प्रचंड रडले आणि माझ्या सासूबाईंशी याबद्दल बोलले.”

juhi-chawla-jay-mehta-wedding-mother-in-law-secret-love-story
जुही चावला व तिचे पती जय मेहता (फोटो- इन्स्टाग्राम)

जुही चावलाच्या सासूबाईंनी रद्द केलेलं लग्न

जुही चावलाच्या सासूबाईंनी तिची परिस्थिती व भावनिक अवस्था समजून घेतली आणि तो मोठा सोहळा रद्द केला होता. जुही म्हणाली, “माझ्या सासूबाई तयार झाल्या. २ हजार लोकांना निमंत्रणं पाठवण्यात आली होती. तरी सासूबाईंनी सर्वांना कळवलं की लग्न आता नाहीये. त्यांनीच त्यांच्या कुटुंबाची छोटेखानी सोहळ्यासाठी मनधरणी केली होती. मी लग्न केलं, पण आमच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे लोक होते. साधारण ९०-१०० पाहुणे असतील. तेवढ्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आमचं लग्न झालं होतं. विचार करा सर्वांच्या विरोधात जाऊन माझ्या सासूबाईंनी जगभरात २ हजार लोकांना निमंत्रणं पाठवूनही भव्य सोहळा रद्द केला होता.”

juhi-chawla-jay-mehta-wedding-mother-in-law-secret-love-story
जय मेहता व त्यांची मुलं जान्हवी आणि अर्जुन (फोटो- इन्स्टाग्राम)

जय मेहतांनी जुही चावलांना पाठवलेला गुलाबांनी भरलेला ट्रक

जय व जुही डेट करत होते तेव्हाचा एक किस्सा तिने ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये सांगितला होता. लग्नाआधी जय रोज तिला पत्रं लिहायचे आणि एकदा तर त्यांनी लाल गुलाबांनी भरलेला संपूर्ण ट्रकच तिच्या घरी पाठवला होता. “लग्नाआधी जय मला रोज पत्रं लिहायचे. लग्नानंतर अर्थातच या गोष्टी थांबल्या. त्या काळात आम्ही एकमेकांना पत्रे आणि ग्रीटिंग कार्ड पाठवायचो, त्याची जागा आता ईमेल आणि व्हॉट्सॲप मेसेजने घेतली आहे. जय आणि माझी भेट एका डिनरमध्ये झाली होती आणि त्यानंतर ते माझ्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत होते. एकदा माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला लाल गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला होता. आणि त्यांना ‘हो’ म्हणायला मला एक वर्षाचा वेळ घेतला होता,” अशी आठवण जुही चावलाने सांगितली होती.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, जय मेहता यांच्या ‘मेहता ग्रुप’ची व्हॅल्यूएशन १७,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जुही चावला व जय मेहता यांनी १९९५ साली लग्न केलं. त्यांना जान्हवी व अर्जुन ही २ अपत्ये आहेत.