Juhi Chawla Richest Bollywood Actress Farmland Story: बॉलीवूड कलाकारांची जीवनशैली आणि त्यांची गुंतवणूक नेहमीच लोकांच्या उत्सुकतेचा विषय असते. सलमान खान असो की अक्षय कुमार, हे कलाकार गुंतवणुकीसोबतच गरजूंच्या मदतीसाठीही सदैव पुढाकार घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, बॉलीवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री असलेल्या जुही चावलाकडे कोट्यवधी रुपयांची शेतजमीन आहे, अन् कोरोनाच्या कठीण काळात तिने ही जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दिली होती.
जवळपास ७,७९० कोटी रुपयांच्या अफाट संपत्तीसह जुही चावला बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तिची एकूण संपत्ती शाहरुख खान, करण जोहर आणि हृतिक रोशन यांच्यापेक्षाही जास्त आहे. सध्या ती चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसून आपला बहुतांश वेळ शेतीकामात घालवते. करोना लॉकडाउनच्या काळात तिने आपली शेतजमीन भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
भूमिहीन शेतकऱ्यांना मदतीचा हात
आपल्या या निर्णयाबद्दल सांगताना जुही चावला म्हणाली होती, “लॉकडाउनमुळे मी आमची शेतजमीन भूमिहीन शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात आम्ही त्यांना भाताची लागवड करू देत असून, पीक आल्यावर त्याची वाटणी होईल. शेतीची ही पद्धत नवी नसून पूर्वीपासून चालत आलेली आहे. पुस्तकी ज्ञानाच्या आधारे आपल्यासारख्या शहरी लोकांना जी माहिती मिळते, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगल्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना इथली जमीन, माती, वारा आणि हवामान यांची समज असते. फक्त पेरणीसाठी भाताच्या बियाण्यांची गुणवत्ता उत्तम असावी आणि केवळ सेंद्रिय पद्धतींचाच वापर व्हावा, शेतात कोणतेही रासायनिक घटक वापरले जाऊ नयेत, एवढीच माझी अट आहे.”
जुही चावलाने फक्त अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर एक निसर्गप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्या म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ती दरवर्षी आपल्या जवळच्या लोकांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक झाडे लावते आणि लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करते. दानधर्म आणि सामाजिक कार्यात ती नेहमी पुढे असते.
जुही चावलाकडे ४४ एकर शेती
जूही चावलाची महाराष्ट्रातील वाडा इथे २० एकर जमीन आहे. ही तिच्या वडिलांनी घेतली होती. वडिलांच्या निधनानंतर जुही ही शेती सांभाळतेय. गेल्या १५ दिवसांपासून ती शेती करतेय. मांडवामध्ये जुहीची १० एकर जमीन आहे. ही जमीन तिने स्वतः खरेदी केली होती. जुही चावलाजवळ ३३ एकर जमीन आहे.
जुही चावलाचे वाडाजवळ फार्महाऊस आहे. इथेच तिचं ऑफिसही आहे. जुही सेंद्रिय शेती करते. तिच्या शेतात आंबे, चिकू, पपई, डाळिंब अशी फळझाडे असून ती भाजीपालाही पिकवते.
