Sujoy Ghosh Talks About Juhi Chawla : सुजोय घोष थ्रिलर चित्रपटांचा मास्टर म्हणून ओळखला जातो. कथेत अनपेक्षित वळणं देण्यात तो तरबेज आहे. मात्र, ही वळणं तो केवळ कथानक पुढे नेण्यासाठी वापरत नाही तर त्यातून मानवी स्वभाव आणि नैतिकतेचे खोल पैलू उलगडतो. पण एक काळ असा होता, जेव्हा तो थरारपट दिग्दर्शक म्हणून ओळखला जात नव्हता. त्या वेळीही त्याला मानवी नातेसंबंधाबद्दल उत्सुकता होती, मात्र तो त्याकडे विनोदाच्या अंगाने पाहायचा. विनोद हे त्याचं माध्यम होतं आणि चतुर संवाद ही त्याची खासियत होती.
याच काळात त्याने ‘झंकार बीट्स’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. ‘दिल चाहता है’नंतर अवघ्या दोन वर्षांनी आलेला हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा होता. मजा आणि परिपक्वता यांचा सुंदर संगम त्यात पाहायला मिळाला. जुही चावला, संजय सुरी आणि राहुल बोस यांना एकत्र आणत सुजोय घोषने प्रभावी स्टारकास्ट उभी केली; तर विशाल-शेखर यांच्या संगीताने चित्रपटाला आणि त्या संगीतकार जोडीला विशेष ओळख मिळवून दिली.
सुजोय घोष काय म्हणाले?
SCREENला दिलेल्या एका मुलाखतीत घोष यांनी सांगितले की, चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर जुही चावलाने सुरुवातीला हा चित्रपट नाकारला होता. त्यातील प्रौढ विनोदामुळे ती थोडी संकोचित झाली असेल. तिने स्क्रिप्ट वाचली आणि ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, ‘मी हा चित्रपट करणार नाही.’ तिने नकार देण्यामागचं कारण विचारलं असता, घोष यांनी स्पष्ट केलं की, तिला एका विशिष्ट दृश्याबाबत आक्षेप होता.
सुजोय पुढे म्हणाले, “एक असा सीन होता की दीप (संजय सुरी)चा दिवस अजिबात चांगला गेलेला नसतो. ऑफिसमध्ये प्रचंड तणाव असतो आणि ते ज्या जाहिरातीवर काम करत असतात, ती त्याला सुचत नाही. त्याच वेळी त्याची सासूही त्याच्याकडे राहायला आलेली असते आणि घरात नवीन बाळ येणार असतं. तो स्वप्न पाहतो की शांती (जुही चावला)ने बाळाला जन्म दिला आहे आणि बाळ घरी आलं आहे. पण तो जेव्हा बाळाला उचलतो, तेव्हा त्या बाळाचा चेहरा त्याच्या सासूसारखा असतो आणि अचानक त्याच्या लक्षात येतं की त्याच्या मागे काहीतरी खूप तेजस्वी उभं आहे. तो मागे वळून पाहतो, तर एक प्रचंड मोठा फ्लुरोसंट कंडोम नाचत असतो आणि त्याला म्हणत असतो, माझा वापर केला असता, तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. ’ मग जुही म्हणाली, ‘हा सीन असेल तर मी चित्रपटात काम करणार नाही,’ त्यामुळे आम्ही तो सीन काढून टाकला.”
त्याच संभाषणात घोष यांनी सुरुवातीच्या तिच्या संकोचानंतरही जुहीसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला. “जुही कदाचित या चित्रपटाची तारणहार होती. चित्रपट करण्यासाठी आम्हाला ज्या मोठ्या स्टारची गरज होती, ती तीच होती. तिच्याशिवाय हा चित्रपट बनलाच नसता आणि तिची व्यक्तिरेखा शांती हिच्याशिवाय तर मी हा चित्रपट करण्याचाही विचार केला नसता” असे ते म्हणाले ‘कहानी’मधील विद्या बालनच्या व्यक्तिरेखेचा संदर्भ देत.
हा चित्रपट नुकताच मुंबईतील काला घोडा महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला, ज्यावेळी सुजोय घोष, संजय सुरी आणि शायन मुन्शीही उपस्थित होते. या महोत्सवात बोलताना सुरी म्हणाले की, ‘झंकार बीट्स’ आजच्या काळात कदाचित बनूच शकणार नाही, कारण “सर्वप्रथम कायदेशीर टीम स्क्रिप्ट वाचेल आणि कंडोम संदर्भांवर लगेच आक्षेप घेईल.”

