मुंबईत ५ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस् २०२६’ च्या निमित्ताने, या पुरस्कार सोहळ्यातील काही जुन्या आणि अविस्मरणीय आठवणींना उजाळा देऊयात. या सोहळ्यातला असाच एक खास क्षण १९९५ मध्ये पाहायला मिळाला होता, जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते व दिग्दर्शक देव आनंद यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने या पुरस्काराची घोषणा करताना देव आनंद यांचं अतिशय सुंदर शब्दांत कौतुक केलं होतं. ती म्हणाली, “डोळ्यांत मिश्कील भाव, डोके झुकवण्याची ती खास शैली आणि तरुणींना वेड लावणारे स्मित… हो, ते दुसरे तिसरे कोणी नसून सर्वांचेच आवडते देव आनंद आहेत.”
जुहीने देव आनंद यांच्या संघर्षाचा एक किस्साही सांगितला होता. “१९४० चा काळ होता. पुण्यातील बाबूराव पै यांच्या ऑफिसबाहेर एक तरुण उभा होता. आत कसे जायचे याचा तो विचार करत होता. अचानक बाबूराव पै बाहेर आले आणि काही कळायच्या आत परत आत गेले. दोन मिनिटांनी एका मुलाने त्या लाजाळू तरुणाला आत बोलावले आणि मग अर्ध्या तासानंतर तो तरुण आनंदाने बाहेर पडला. त्याला ‘हम एक है’ या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता म्हणून पहिली संधी मिळाली होती. पुढे त्याने संधीचे सोने केले. ते होते देव आनंद. पाच दशकांत देव आनंद यांनी १०० चित्रपट आणि त्यात ४५ सिल्व्हर ज्युबिली व १० गोल्डन ज्युबिली चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा या सर्वांत तरुण नायकाला आपण हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करत आहोत.”
बी. आर. चोप्रा यांच्या हस्ते सन्मान
दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या हस्ते देव आनंद यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी चोप्रा म्हणालेले, “गेल्या वर्षी मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला आनंद झाला होता. पण, आज देव आनंद यांना हा पुरस्कार देताना मला त्याच्यापेक्षाही जास्त आनंद होत आहे. आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करून काम करत राहणे, हे देव आनंद यांनी सिद्ध केले आहे.”
“५० वर्षं जणू एका क्षणात सरली”
पुरस्कार स्वीकारल्यानंतर देव आनंद भावूक झाले होते. ते म्हणालेले, “हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. ५० वर्षांचा काळ खूप मोठा असतो; पण माझ्यासाठी तो जणू एका क्षणात निघून गेला. १९४७ मध्ये माझा पहिला चित्रपट आला होता. काळ कसा सरतो हे तुम्ही काय आणि कसे काम करता यावर अवलंबून असते. या सन्मानाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”
