Juhi Chawla Singing Viral Video: बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री म्हणून जुही चावला ओळखली जाते. ती याबरोबरच अनेक चित्रपटांतील उत्तमोत्तम भूमिकेसाठी ओळखली जाते.
कयामत से कयामत तक, बेनाम बादशहा, कर्ज, तुम मेरे हो, स्वर्ग, लव्ह लव्ह लव्ह, आईना, लुटेरे, इज्जत की रोटी, बोल राधा बोल, शतरंज, कर्तव्य, येस बॉस, इश्क, लक बाय चान्स, कल किसने देखा, चॉक अँड डस्टर, दीवाना मस्ताना, राजू बन गया जेंटलमन अशा अनेक चित्रपटांत जुही चावलाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
सनी देओल, आमिर खान, राजेश खन्ना, ऋषी कपूर, शाहरुख खान, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, अनिल कपूर, नागार्जुन, जॅकी श्रॉफ, विनोद खन्ना अशा अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारल्या.
अभिनेत्री आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे.
जुही चावलाचा २२ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
२००४ मध्ये पार पडलेल्या झी सिने अवॉर्डस सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये जुहीने गाणे गायल्याचे पाहायला मिळत आहे. कल हो ना हो या सिनेमातील ती गाणे गात आहे. तिचा आवाज ऐकून सगळे जण थक्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रेक्षकांमध्ये अनेक कलाकार बसले आहेत. त्यामध्ये रेखा, सुश्मिता सेन यांचाही समावेश आहे; तर करण जोहर शोचे सूत्रसंचालन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा जुही चावला गाणे गायला सुरुवात करते, तेव्हा सुश्मिता सेन, करण जोहर आणि प्रेक्षकांमधील अनेकांना तिचा आवाज ऐकून धक्का बसल्याचे दिसते. पुढे सुश्मिता टाळ्या वाजवत तिचे कौतुक करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर, करण जोहर स्तब्ध झाल्याचे दिसत आहे. तर, प्रेक्षक ओरडून तिचे कौतुक करत असल्याचे दिसत आहेत.
झी सिने अवॉर्डसच्या स्टेजवर गाणे गायल्यानंतर जुहीने त्याबद्दल वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की, इतक्या मोठ्या स्टेजवर मी पहिल्यांदाच गायले आहे.
जुही चावलावर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
आता या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “जुहीचा आवाज ऐकून नि:शब्द झाले”, “काय आवाज आहे”, “जुही चांगले गाते”, “ती उत्तम गायिका आहे”, “सुश्मिता सेनची प्रतिक्रिया”, “तो सुवर्णकाळ होता”, “जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे कौतुक करते”, “हे अविश्वसनीय आहे, जुहीचा आवाज किती छान आहे”, “माझी आवडती हिरोईन”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, जुही चावला चित्रपटांत मोठ्या प्रमाणात सक्रिय नसली, तरीही ती सोशल मीडियावर सक्रिय असते. विविध फोटो शेअर करत ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
