बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, कधी त्यांनी सोशल मीडियावर साकारलेल्या भूमिकांमुळे तर कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे हे कलाकार चर्चेत असतात. आता आमिर खानचा मुलगा जुनैद आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात’

७ फेब्रुवारी २०२५ ला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे. निर्मात्यानी सोशल मीडियावर मंगळवारी याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आले नाही.

निर्मात्यांनी सोशल मीडियावर जुनैद खान आणि खुशी कपूरला टॅग करत पोस्ट शेअर केली आणि लिहिले, तुम्ही डिजीटल काळातील प्रेम अनुभवण्यास तयार आहात का? अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

इन्स्टाग्राम

अद्वैत चंदन यांनी याआधी आमिर खानचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आधुनिक काळातील प्रेम, सोशल मीडिया आणि माणसांमाणसांतील संबंध यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. खुशी कपूरची बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत “हे विशेष असणार आहे, वाट बघू शकत नाही, खुशी माझे तुझ्यावर प्रेम आहे”, अशा कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Masaba Gupta on Vivian Richards: ‘वर्णद्वेषाबद्दल व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या मनात राग, त्यांनी खूप भोगलं’, मुलगी मसाबा गुप्ता काय म्हणाली?

जुनैदने ‘महाराज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याने साकारलेल्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. त्याच्या अभिनयाची सर्व स्तरातून प्रशंसा झाल्याचे पाहायला मिळाले होते. ‘महाराज’ या चित्रपटात जयदीप अहलावत, शर्वरी वाघ हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसले. सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. १८६२ च्या एका केसवर आधारित असल्याने वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले होते.

याबरोबरच खुशी कपूरनेदेखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. खुशीबरोबर या चित्रपटात शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य यांनीही पदार्पण केले आहे.

आता जुनैद आणि खुशी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.