Aamir Khan Gauri Spratt Marriage Junaid Khan: आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी रविवारी, ५ जुलै रोजी एका खासगी समारंभात नोंदणी पद्धतीने लग्न केलं. या लग्नाला त्यांच्या कुटुंबाबरोबरच त्यांचे जवळचे मित्रच उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान, आता आमिरचा मुलगा जुनैद खानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. जुनैदने त्यात म्हटलं होतं की तो रिलेशनशिपबद्दल वडील आमिर खानशी कोणतीही चर्चा करत नाही.
६१ वर्षांच्या आमिर खानने तिसरं लग्न केलं. त्याच्या लग्नात त्याची तिन्ही मुलं आणि संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले होते. अशातच, आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खानची एक जुनी मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.
काय म्हणाला होता जुनैद खान?
वर्षभरापूर्वी ‘हॉटरफ्लाय’ला जुनैद खानने मुलाखत दिली होती. त्यात जुनैदने सांगितलं होतं की तो रिलेशनशिपच्या बाबतीत त्याच्या वडिलांचा सल्ला घेत नाही. वडील आमिर खानकडून रिलेशनशिपबद्दल कधी काही सल्ला घेतला आहे का? असं जुनैदला विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देताना जुनैद म्हणाला होता, “मी त्यांच्याकडून रिलेशनशिपबद्दल सल्ला खूप कमी घेतो आणि कदाचित याच कारणामुळे ते नेहमी म्हणतात की माझी मुलं माझं ऐकतच नाहीत.”
अभिनेता आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी लग्न केलं होतं. दोन्ही वेळा परस्पर संमतीने त्यांचा घटस्फोट झाला. आताही आमिरचे त्याच्या दोन्ही एक्स पत्नींशी चांगले संबंध आहेत आणि तो अनेक प्रसंगी त्या दोघींबरोबर दिसतो.
आमिर खान व गौरी स्प्रॅटची पहिली भेट
दरम्यान, आमिर खान गौरीला सुमारे २० वर्षांपूर्वीच भेटला होता, पण तेव्हा त्यांची फक्त ओळख झाली होती. त्यानंतर २०२४ मध्ये ते बंगळुरूत पुन्हा भेटले. तेव्हा त्यांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर २०२५ मध्ये आमिर खानने त्याच्या ६० व्या वाढदिवशी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. इतकंच नाही तर त्याने गौरीची ओळख सर्वांशी करून दिली होती. त्यानंतर बरेचदा तो व गौरी एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावायचे तसेच डेटवर जायचे.
आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आणि लग्न केलं
एका मुलाखतीत आमिरने म्हटलं होतं की, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा कधी प्रेम मिळेल असं त्याला वाटलं नव्हतं. तो म्हणाला, “गौरीला भेटण्यापूर्वी मला वाटायचं की आता माझं वय झालं आहे आणि या वयात मला कोण भेटणार? याच काळात मी थेरपी घेण्यास सुरुवात केली आणि सर्वात आधी स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला अधिक चांगलं बनवणं गरजेचं आहे हे समजून घेतलं. मी त्याच गोष्टीवर काम केलं, आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात गौरी आली.”
