Why Dhurandhar Wasn’t Selected As India’s Oscar Entry : यंदा भारताने ऑस्करच्या शर्यतीत ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट पाठवला आहे. भारतातील हिंदीसह प्रादेशिक भाषांमधील ३० पेक्षा जास्त चित्रपटांमधून गोंधळची निवड झाली. बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंहचा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अधिकृत शर्यतीतून बाहेर पडले आहेत. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने भारताची अधिकृत एंट्री म्हणून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. १४ सदस्यांच्या ज्युरी समितीमध्ये ‘धुरंधर’ला केवळ ४ मते मिळाली. ज्युरी सदस्य विवेक वासवानी ‘धुरंधर’ला न निवडण्यामागचं कारण सांगितलंय.

वासवानी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, ज्युरीने ‘धुरंधर’ किंवा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ यांना ऑस्करच्या दर्जाचे दावेदार मानले नाही. तसेच, ऑस्करच्या मंचावर भारताच्या अस्सल संस्कृतीचे प्रतिनिधित्व करेल अशा चित्रपटाचा शोध ज्युरीला होता, त्या निकषात ‘धुरंधर’ बसू शकला नाही. १४ सदस्यांच्या ज्युरी समितीमध्ये ‘धुरंधर’ला केवळ ४ मते मिळाली. ‘धुरंधर’बाबत ज्युरीचा निर्णय चित्रपटाची लोकप्रियता किंवा व्यावसायिक यशावर आधारित नव्हता.

‘गोंधळ’ने खालील चित्रपटांना टाकलं मागे

‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटाची २०२७ च्या ऑस्करसाठी ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीत अधिकृत निवड केली आहे. ‘गोंधळ’ने शर्यतीत असलेल्या १४ हिंदी, ४ मराठी, ४ तेलुगू, ३ गुजराती, ३ तमिळ, १ मल्याळम, १ नेपाळी आणि नागालँडच्या एका चित्रपटाला मागे टाकत बाजी मारली. अंतिम टप्प्यात ज्युरीसमोर ‘गोंधळ’, ‘अंग’ आणि ‘मै वापस आऊंगा’ हे तीन पर्याय उरले होते, ज्यातून सर्वाधिक मते ‘गोंधळ’ला मिळाली.

गोंधळ चित्रपटाचा ट्रेलर

‘गोंधळ’मधील कलाकार

‘गोंधळ’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककलेच्या व धार्मिक विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभूसह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाला इलैयाराजा यांनी संगीत दिलंय.

गोंधळ सिनेमा ऑस्करला जाणं मराठी चित्रपटासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. यापूर्वी २००४ मध्ये ‘श्वास’, २००९ मध्ये ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि २०१५ मध्ये ‘कोर्ट’ या तीन मराठी चित्रपटांना भारताने अधिकृत एंट्री म्हणून ऑस्करला पाठवलं होतं.

दरम्यान, ‘गोंधळ’ची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली असली, तरी ‘धुरंधर’ किंवा ‘मै वापस आऊंगा’ शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत. ‘आरआरआर’ चित्रपटाने ज्याप्रमाणे स्वतंत्रपणे अर्ज करून ऑस्कर जिंकला होता, तो पर्याय या चित्रपटांच्या निर्मात्यांसमोर खुला आहे.