Ranveer Singh Casting Couch Experience: नवख्या कलाकारांसाठी चित्रपटसृष्टीत काम मिळवणं सोपं नाही. अनेकांबरोबर वाईट गोष्टी घडतात, अनेकांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. बॉलीवूडचा पॉवरहाऊस अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. मात्र, या यशामागे त्याचा मोठा संघर्ष दडला आहे. रणवीरने एका जुन्या मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील काळ्या सत्याचा, म्हणजेच ‘कास्टिंग काउच’चा अनुभव सांगितला होता.
स्ट्रगलिंग काळात एका कास्टिंग एजंटने रणवीरचा पोर्टफोलिओ न पाहताच त्याला “स्मार्ट आणि सेक्सी” बनण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नाही तर, “मला फक्त स्पर्श करू दे”, अशी अत्यंत घृणास्पद मागणीही त्या एजंटने रणवीरकडे केली होती. या धक्कादायक अनुभवानंतर रणवीरने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. ‘कास्टिंग काउच’ हे बॉलीवूडचे वास्तव असल्याचे सांगत रणवीरने नवीन कलाकारांना सावध राहण्याचा इशाराही ‘NDTV’ ला दिलेल्या मुलाखतीत दिला होता. रणवीर सिंह सध्या सतत चर्चेत असल्याने त्याची ही जुनी मुलाखत पुन्हा एकदा समोर आली आहे.
‘कास्टिंग काउच’ हे हिंदी चित्रपटसृष्टीचं वास्तव
सुमारे १० वर्षांपूर्वीच्या मुलाखतीत रणवीरने सांगितलं होतं की, ‘कास्टिंग काउच’ हे हिंदी चित्रपटसृष्टीचं वास्तव आहे आणि त्याला स्वतःला याचा अनुभव आला आहे. रणवीरने एका कास्टिंग एजंटचे लक्ष वेधून घेण्यासाठी खूप मेहनत घेऊन स्वतःचा एक पोर्टफोलिओ तयार केला होता. अभिनेता होण्यापूर्वी रणवीरने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं, त्यामुळे आपला पोर्टफोलिओ कचऱ्याच्या डब्ब्यात फेकला जाऊ नये याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. परंतु, जेव्हा त्या कास्टिंग एजंटने त्याच्या पोर्टफोलिओकडे साधं बघितलंही नाही आणि त्याला त्यात अजिबात रस नसल्याचं स्पष्ट सांगितलं तेव्हा रणवीरला मोठा धक्का बसला होता.
‘तुला स्मार्ट आणि सेक्सी बनावं लागेल’
रणवीर सिंह ती आठवण सांगत म्हणाला, “नंतर मला समजलं की त्याला नक्की कशात रस होता. तो मला म्हणाला, ‘तुला स्मार्ट आणि सेक्सी बनावं लागेल. जो स्मार्ट आणि सेक्सी असतो, तोच पुढे जातो. मी तुला अनेक ऑफिसमध्ये पाठवू शकतो, मग तूच मला म्हणशील—घे, स्पर्श कर.'” त्या माणसाचा उद्धटपणा पाहून रणवीरला धक्का बसला. त्यामुळे त्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
‘फक्त मला स्पर्श करू दे’, एजंटची धक्कादायक मागणी
रणवीर पुढे म्हणाला, “त्याच्यात इतकी हिंमत होती की तो माझ्याशी तडजोड करू इच्छित होता. तो म्हणाला, ‘ठीक आहे, आपण काहीच करणार नाही, फक्त मला स्पर्श करू दे.’ त्यानंतर तो म्हणाला, ‘ठीक आहे, मी फक्त बघेन.’ मी त्याला स्पष्टपणे ‘नाही’ म्हटलं. जेव्हा मी नकार देऊन तिथून निघालो, तेव्हा तो प्रेमभंग झालेल्या एखाद्या प्रियकराप्रमाणे दुखावला गेला होता.”
त्या माणसाने अनेक नवीन कलाकारांसोबत असेच गैरवर्तन केले होते, असं नंतर आपल्याला समजलं होतं, अशी माहितीही रणवीरने दिली होती.
