Director Sanjay Gupta Passes Away: ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या सुपरहिट क्राइम ड्रामा चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन झाले. राहत्या घरी अचानक खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. संजय गुप्ता ५७ वर्षांचे होते. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या बातमीला दुजोरा देत दुःख व्यक्त केले आहे. ते पूर्वी एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले होते.

अशोक पंडित म्हणाले, “ही बातमी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. आमचे मित्र आणि उत्तम दिग्दर्शक संजय गुप्ता आता आपल्यात नाहीत, ही बातमी समजली. राहत्या घरी डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले. आणखी एक गुणी कलाकार खूप लवकर निघून गेला. ते एक उत्तम कथाकार, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि उत्तम दिग्दर्शक होते. आपल्या चित्रपटसृष्टीचे हे खूप मोठे नुकसान आहे.”

काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबई प्रवासादरम्यान झालेल्या एका भीषण अपघातातून गुप्ता थोडक्यात वाचले होते. त्या अपघातात त्यांना खूप दुखापत झाली होती, पण नंतर ते पूर्णपणे बरे झाले होते.

संजय गुप्ता यांच्या करिअरची सुरुवात व चित्रपट

संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये संजय दत्त, आदित्य पांचोली आणि रवीना टंडन यांची भूमिका असलेल्या ‘आतिश: फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. ‘कांटे’ आणि ‘शूटआउट ॲट वडाळा’ यांसारख्या चित्रपटांनी इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांनी विवेक ओबेरॉय, अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाची निर्मिती आणि सह-लेखनही केले होते. संजय गुप्ता हे त्यांच्या क्राइम ड्रामा, गँगस्टर चित्रपट आणि ॲक्शन थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांनी ‘कांटे’, ‘आतिश’, ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’, ‘शूटआउट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

संजय गुप्ता व संजय दत्तची मैत्री आणि मतभेद

संजय गुप्ता यांचे अभिनेता संजय दत्तबरोबर खूप चांगले संबंध होते. संजय दत्तने त्यांच्या ‘मुसाफिर’ आणि ‘जिंदा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, करिअरच्या नंतर त्यांच्यात मतभेद झाले होते. “तो माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट काळ होता. मी जवळपास हार मानली होती. मी खंडाळ्यात एका हॉटेलचे काम सुरू केले होते आणि आठवड्यातून चार दिवस तिथे जायचो. मला वाटलं होतं की आता मला चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, त्यामुळे मी वेगळं काहीतरी करायला हवं,” असं संजय गुप्ता म्हणाले होते.

संजय गुप्ता यांनी अनू लेखीशी लग्न केलं होतं. पण त्यांचा घटस्फोट झाला.