Kacha Badam Anjali Arora as Sita : रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक रामायणावर आधारित चित्रपट येणार आहे. अभिषेक सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये ‘कच्चा बदाम’मुळे व्हायरल झालेल्या अंजली अरोराने सीतेची भूमिका साकारली आहे.

‘महाकाव्य श्री रामायण कथा’ चित्रपटाचा टीझर व पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये अभिनेता देव शर्मा या चित्रपटात प्रभू श्रीराम, शील वर्माने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. मात्र, सिनेमामध्ये व्हायरल रीलस्टार अंजली अरोराने सीतेची भूमिका साकारल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये प्रभू राम व सीता यांचे लग्न, वनवास आणि लंकेतील काही क्षण दाखविण्यात आले आहेत.

‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोरा सीतेच्या भूमिकेत

‘महाकाव्य श्री रामायण कथा’च्या ९० सेकंदांच्या ट्रेलरमध्ये राम आणि सीतेच्या विवाहाची झलक पाहायला मिळते. त्यानंतर त्यांचा वनवास, दोघांमधील प्रेम आणि सीतेचे हरण हे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. ट्रेलरच्या शेवटी प्रभू श्रीराम धनुष्यबाण घेऊन उभे असल्याचे दिसते आणि रामसेतू बांधण्याची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळते. पण, त्यामध्ये अंजली अरोराला सीतेच्या भूमिकेत पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या.

‘रामायण’च्या कास्टिंगवरून सोशल मीडियावर ट्रोलिंग

अंजली अरोराच्या कास्टिंगवरून एका नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एकाने लिहिले, “निर्मात्यांमध्ये तर खूपच हिंमत आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “सीतामाता म्हणून हे कोणाला घेतलं आहे. ही तर ‘कच्चा बदाम’मुळे लोकप्रिय झालेली रीलस्टार आहे. हिला सीता म्हणून पाहणं प्रेक्षकांना शक्य नाही.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ” ‘कच्चा बदाम’चं चांगलं होतं, हे कशाला केलं.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ” ‘रामायण’मध्ये कोणाला भूमिका दिल्या पाहिजेत, हेसुद्धा निर्मात्यांच्या लक्षात येत नाही.”

‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या सिनेमाची प्रकाश महोबिया, संजय बुंदेला व मोनिका सेन यांनी निर्मिती केली असून, अभिषेक सिंह यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलरला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले असून, काही नेटकऱ्यांना यातील साधेपणा आवडला आहे. चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सचे काही जणांनी कौतुक केले आहे. मात्र, कलाकारांच्या निवडीवरून निर्मात्यांना ट्रोल केले जात आहे. दरम्यान, चित्रपटात रावण आणि हनुमानाची भूमिका कोण साकारणार, याचा खुलासा झालेला नाही. हा सिनेमा २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

साई पल्लवीबरोबर अंजली अरोराची तुलना

अंजली अरोराने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सीतेच्या भूमिकेबद्दल भाष्य केले होते. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत असल्यामुळे तिच्या अभिनयाची साई पल्लवीबरोबर तुलना होणार असल्याची जाणीव असल्याचे अंजलीने सांगितले होते.
अंजली अरोराचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिने कंगना रणौत यांच्या ‘लॉकअप’च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला होता. आता जवळपास चार वर्षांनंतर अंजली अरोरा ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या पौराणिक चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.