दिवंगत अभिनेते कादर खान आणि महानायक अमिताभ बच्चन एकेकाळी एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. दोघांनी बेनाम (१९७४), हम (१९९१) यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण त्यांची मैत्री फक्त दोन दशकं टिकली. नंतर असं काही घडलं की त्यांच्यात मैत्री दुरावा आला.

लेखक आणि पत्रकार हनीफ झवेरी यांनी ‘मेरी सहेली’शी बोलताना अमिताभ बच्चन आणि कादर खान यांच्यातील एकेकाळच्या घट्ट मैत्रीबद्दल आणि काळाच्या ओघात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केले. “कादर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यात इतकी घट्ट मैत्री होती की, जेव्हा अन्वर अली ‘खुद्दार’ चित्रपट बनवत होते, तेव्हा ते मदतीसाठी अमिताभ यांच्याकडे गेले होते. अमिताभ यांनी कन्फर्मेशन लेटर दिल्यास फायनान्सर पैसे गुंतवतील, असं अन्वर अलींचं म्हणणं होतं. अमिताभ बच्चन यांनी ते पत्र दिलं आणि त्यांना सलीम-जावेद यांच्याकडून कथा लिहून घेण्याचा सल्ला दिला होता,” असं हनीफ म्हणाले.

…अन् बिग बींना घेतलं कादर खान यांचं नाव

अन्वर यांनी सलीम-जावेद यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी साइनिंग अमाऊंट मागितली, ती अन्वरकडे नव्हती. “अन्वर पुन्हा अमिताभ बच्चनकडे गेले आणि सांगितलं की सलीम-जावेद पैसे मागत आहेत, पण सध्या माझ्याकडे नाहीत. मग अमिताभ बच्चन यांनी त्यांना कादर खान यांच्याकडे जाण्यास सांगितलं आणि ते पैसे मागणार नाहीत, असंही म्हटलं,” अशी आठवण हनीफ झवेरींनी सांगितली.

हनीफ यांच्या मते, अमिताभ बच्चन यांनी एक फोन केला की कादर खान ते काम करायला तयार असायचे. “अमिताभ आणि कादर खान यांच्यातील संबंध इतके घट्ट होते की, अमिताभ यांच्या एका फोनवर कादर खान यांनी कोणतेही पैसे न घेता ‘खुद्दार’ चित्रपटाचे लेखन करण्यास होकार दिला. तो चित्रपट सुपरहिट ठरला.”

Why Kader Khan and Amitabh Bachchan one phone call friendship faded
अमिताभ बच्चन व कादर खान यांचा जुना फोटो (सौजन्य – एक्सप्रेस आर्काइव्ह)

अमिताभ बच्चन निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा

अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, त्याबद्दल हनीफ झवेरींनी सांगितलं. “त्यावेळी अमिताभ बच्चन अभिनयातून निवृत्ती घेत असल्याच्या बातम्या येत होत्या. ते नवीन चित्रपट साइन करत नव्हते. फक्त ‘शहेनशाह’ आणि इतर काही मोजके चित्रपटच त्यांच्याकडे होते. महेश भट्ट आणि राकेश रोशन यांच्यासारखे दिग्दर्शक त्यांच्याकडे कथा घेऊन जात, पण अमिताभ त्यांना नकार द्यायचे. त्यामुळे लोकसभेत गेल्यामुळे आणि राजीव गांधींशी जवळीक वाढल्यानंतर अमिताभ कदाचित पूर्णवेळ राजकारणात जातील, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या,” असं हनीफ म्हणाले.

हनीफ यांनी अमिताभ बच्चनसंदर्भातील या चर्चांबद्दल कादर खान यांना विचारलं होतं. “कादर खान म्हणाले होते की अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टी सोडत नाहीयेत, ते फक्त थोडी विश्रांती घेत आहेत. आणि जर अमिताभ बच्चन यांनी खरोखरच अभिनय सोडला, तर मी सुद्धा इंडस्ट्री सोडून देईन,” इतकं घट्ट अमिताभ बच्चन व कादर खान यांचं नातं होतं, असं हनीफ यांनी सांगितलं.

अमिताभ बच्चन आणि कादर खान यांच्यातील मैत्रीत दुरावा का आला?

हनीफ यांच्या मते, “नंतर कदाचित अमिताभ बच्चन थोडे अहंकारी झाले असावे. अमिताभ बच्चन किंवा कादर खान या दोघांपैकी कोणीही मला हे थेट सांगितलं नाही, परंतु कादर खान यांची एक मुलाखत व्हायरल झाली होती, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “अमिताभ बच्चन यांची अशी इच्छा होती की मी त्यांना ‘सर’ म्हणून हाक मारावी. मी तसं करू शकलो नाही. ज्याच्याबरोबर माझी इतकी जुनी मैत्री होती, ज्यावेळी मी चित्रपटात आलो तेव्हापासून ज्याला ओळखतो, त्याला मी अचानक ‘सर’ कसं म्हणू शकेन? तिथूनच आमच्यात मतभेद सुरू झाले आणि आम्ही एकमेकांपासून दुरावलो,” असं कादर खान म्हणाले होते.