Hanuman Ansh director Vishal Chaturvedi on Kaichi Dham Crowd : आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. सिनेमा रिलीज होऊन ५९ दिवस झाले असून, सिनेमाने ४०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. ‘हनुमान अंश’ सिनेमानंतर नीम करोली बाबा यांच्याशी संबंधित धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी वाढू लागल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर लेखक व दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

‘हनुमान अंश’ सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक विशाल चतुर्वेदी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशाल चतुर्वेदी म्हणाले, “कैंची धाम परिसरामध्ये सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक जणांचे असे म्हणणे आहे की, ‘हनुमान अंश’ सिनेमा पाहिल्यानंतर भाविक तिथे जास्त प्रमाणात जात आहेत. असे असेल तरीही किंवा असे नसेल तरीही आपल्याला कैंची धामची जी परिस्थिती आहे, त्याचा अंदाज घेऊनच तिथे गेले पाहिजे.”

कैंची धामच्या गर्दीबाबत काय म्हणाले विशाल चतुर्वेदी?

पुढे ते म्हणाले, “कैंची धाममध्ये कशी परिस्थिती असेल, याचा विचार करून तिथे गेले पाहिजे. याचबरोबर महाराजजींशी संबंधित इतर काही पवित्र स्थानं आहेत. जर तुम्हाला कैंची धामला जाता येत नसेल, तर काकडी घाट आणि हनुमान गढी मंदिर आहे. महाराजजींचं जन्मस्थान अकबरपूर, जिथे महाराजांनी समाधी घेतली ते वृंदावन आणि नीम करोली गाव, जिथे महाराजांनी तपश्चर्या केली, ही स्थानंदेखील खूप महत्वाची आहेत.”

पुढे विशाल चतुर्वेदी म्हणाले, “माझी सर्वांना विनंती आहे की, जर कैंची धामला प्रचंड गर्दी आहे आणि तासन् तास रांगेत उभं राहावे लागत असेल, तर तुम्ही या बाकीच्या स्थळांना भेट देऊ शकता आणि महाराजजींचं दर्शन घेऊ शकता. या सर्व ठिकाणी महाराजजींचं वास्तव आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या मनातही महाराजजींचं वास्तव आहे. गर्दीमध्ये महिला आणि लहान मुलं अडकली असून, त्यांना त्रास होतोय. तर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ही विनंती आहे.”