मनोरंजन विश्वात असे अनेक गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत ज्यांनी अनेक आव्हानांचा सामना करुन इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नसतो. असंच काहीसं घडलेलं एका लोकप्रिय गायकाबरोबर ज्याने एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार केला होता, पण आज तोच त्याच्या क्षेत्रातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. या गायकाचं नाव आहे कैलाश खेर.
कैलाश खेर यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत ज्यांना प्रेक्षकांचा प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी गायलेल्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत ‘यू ही चला चल’, ‘अल्लाह के बंदे’, ‘चांद सिफारिश’, ‘तेरी दिवानी’, ‘बाबम बम’ अशा अनेकांचा समावेश आहे. इतकी लोकप्रिय गाणी देणाऱ्या कैलाश यांच्या मनात एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार आला होता.
घरातूनच मिळाला गायनाचा वारसा
कैलाश खेर यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि संगीताचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील पंडित मेहर सिंह खेर हे गायक होते. कैलाश यांना संगीताचे धडेही वडिलांकडूनच मिळाले. संगीताची ओढ इतकी होती की, अगदी लहान वयातच त्यांनी गायक म्हणून करिअर करण्याचा निर्धार केला होता. मात्र, यशस्वी गायक होण्यापूर्वी त्यांना अनेक कठीण प्रसंगांचा आणि संघर्षांचा सामना करावा लागला.
संगीतासाठी कैलाश खेर यांनी घर सोडलं होतं. अवघ्या १४व्या वर्षी ते मेरठहून दिल्लीला गेले. दिल्लीत राहून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यासाठी म्युझिक क्लास जॉइन केला. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी संध्याकाळच्या वेळी लहान मुलांना संगीत शिकवायला सुरुवात केली. त्यासाठी ते प्रत्येक विद्यार्थ्याकडून १५० रुपये फी घेत असत.
…म्हणून आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय
‘आप की अदालत’मध्ये कैलाश खेर यांनी सांगितलं होतं की, १९९९ साली त्यांनी एका मित्राबरोबर हस्तकला (हँडीक्राफ्ट) व्यवसाय सुरू केला होता. मात्र, या व्यवसायात त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. या अपयशामुळे ते इतके खचले की त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. इतकंच नव्हे, तर स्वतःचं आयुष्य संपवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता.
कैलाश खेर यांनी काही काळ ऋषिकेश येथे राहून साधू-संतांच्या सान्निध्यात वेळ घालवला होता. त्या काळात ते गंगा घाट येथे साधू-संत आणि भाविकांबरोबर भजनही गायचे. त्यांना बॉलिवूडमध्ये ‘रब्बा इश्क न होवे’ आणि ‘अल्ला के बंदे हंस दे’ या गाण्यांमुळे मोठी ओळख मिळाली. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये ‘पिया घर आवेंगे’, ‘बम लहरी’, ‘सैयां’, ‘दौलत शोहरत आणि तेरी दीवानी’ यांचाही समावेश आहे.
