Kajal Aggarwal On Salman Khan : दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल हिने बॉलीवूडमध्येही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. काजलने ‘मगधीरा’, ‘सिंघम’, ‘थुप्पाक्की’ आणि ‘इंडियन २’ यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्य व बॉलीवूडमध्ये काम केलेल्या काजलनं दोन्ही इंडस्ट्रीतील कामाची पद्धतीवर मत मांडले आहे. बॉलीवूडमध्ये वेळ पाळली जात नसल्याची खंत काजलने व्यक्त केली आहे.

काजल अग्रवालने शुभंकर मिश्राला दिलेल्या पॉडकास्टमध्ये सिनेविश्वातील अनुभव सांगितले आहेत. यावेळी तिने बॉलीवूडमधील भूमिका काळजीपूर्वक निवडल्याचे सांगितले. ती म्हणाली, “साऊथ इंडस्ट्रीमध्ये मला ज्या दर्जेदार भूमिका मिळत होत्या, तशा मला बॉलीवूडमध्ये मिळत नव्हत्या. मला नेहमी चांगल्या व प्रभावी भूमिका साकारायला आवडतात, पण मला हव्या तशा भूमिका मिळत नव्हत्या. पण जर दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मला चांगलं काम होतं तर साधारण भूमिकेसाठी मी बॉलीवूडमध्ये कशाला काम करू? दर्जेदार चित्रपट व भूमिका करणं या गोष्टींना मी नेहमी प्राधान्य दिले आहे.”

कामाशी पूर्णपणे एकनिष्ठ – काजल

पुढे ती म्हणाली, “मनोरंजन क्षेत्रामध्ये भाषा ही कधीच अडथळा बनली नाही. एखादा सिनेमा तयार होण्याची जी कला आहे, ती मला खूप आवडते. माझं या कलेवर प्रेम आहे. पण सात ते आठ चित्रपट केल्यानंतर मला सिनेमांमध्ये काम करणं आवडू लागलं आणि मी त्या कामाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिले.”

बॉलीवूडने हे शिकलं पाहिजे – काजल अग्रवाल

काजल अग्रवालने वेळेचे महत्त्व आणि शिस्त बॉलीवूडने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडून शिकायला हवी असे स्पष्ट मत तिने मांडले. ती म्हणाली, “वेळेचं महत्त्व आणि वेळ पाळणं ही गोष्ट बॉलीवूडने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडून शिकली पाहिजे. हिंदी चित्रपटांमध्ये कोणतीही गोष्ट वेळेवर होत नाही. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेनुसार होते. मला ठरलेल्या वेळेत सेटवर पोहोचण्याची सवय आहे आणि मला तसंच काम करायला आवडतं. मात्र हिंदी चित्रपटांमध्ये वेळेचं कोणतंच नियोजन नसतं.”

सलमान खानने खूप वाट पाहायला लावली – काजल

यानंतर तिला कोणत्या अभिनेत्यासाठी सर्वात जास्त वाट पाहावी लागली, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर काजल म्हणाली, “सलमान खानने मला खूप जास्त वेळ वाट पाहायला लावली होती आणि त्याची मला सवय नव्हती. त्यावेळी नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न मला पडला होता. तो दुपारी किंवा संध्याकाळी सेटवर यायचा. तोपर्यंत मी सेटवर असलेल्या जिममध्ये व्यायाम करायचे. मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील वेळेचं पालन आणि शिस्त याची सवय आहे.”