Bollywood Actress On Marriage: बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये बॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार हजेरी लावताना दिसत आहेत.

‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये आतापर्यंत सलमान खान व आमिर खान, अक्षय कुमार व सैफ अली खान, वरुण धवन व आलिया भट्ट, फराह खान व अनन्या पांडे या कलाकारांनी हजेरी लावली आहे. नुकतीच विकी कौशल व क्रिती सेनॉन या कलाकारांनी या मंचावर हजेरी लावली होती.

लग्नाला एक्सपायरी डेट…

या शोमध्ये काही विधानं केली जातात. या विधानाशी सहमती किंवा असहमती दर्शवायची असते. जे सहमत असतील ते हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये जातात. जे त्या विधानाशी असहमत असतील त्या लाल रंगाच्या बॉक्समध्ये जातात. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये ट्विंकलने विचारले की, “लग्नाला एक्सपायरी डेट आणि नूतनीकरणाचा पर्याय असावा का”, यावर काजोलने सहमती दर्शवली आणि हिरव्या बॉक्समध्ये उभी राहिली.

यावर ट्विंकल म्हणाली, “मला वाटत नाही असे असायला हवे, कारण हे लग्न आहे, वॉशिंग मशीन नाही.” यावर काजोल असं म्हणाली, “मला असे वाटते, कारण कोणी असं सांगितलं आहे की योग्य वेळी योग्य मुलाशी लग्न होईल? त्यामुळे नूतनीकरणाचा पर्याय असावा आणि जर एक्सपायरी डेट असेल तर जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही,” असे म्हणत तिने ट्विंकलला हिरव्या बॉक्समध्ये येण्याचे आवाहन केले.

या सेगमेंटमध्ये पुढचे विधान असे होते की, पैशाने आनंद विकत घेता येतो. यावर ट्विंकल आणि विकी कौशलने सहमती दर्शवली, तर काजोल व क्रितीने असहमती दर्शवली. काजोल म्हणाली, “मला असे वाटत नाही. कितीही पैसे असले तरी त्याने आनंद विकत घेता येत नाही. मला असे अनेकदा वाटते की पैसे आनंद मिळवण्यामध्ये अडथळा बनतो.”

क्रितीचा या विधानावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर ती म्हणाली की, काही प्रमाणात पैशाने आनंद मिळवता येतो. दरम्यान, आता आगामी काळात हे कलाकार कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.