बॉलीवूड अभिनेत्री काजोल तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा मोकळेपणाने आणि स्पष्टपणे तिची मतं मांडत असते. अनेकदा ती तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दलही बोलत असते. अशातच अभिनेत्रीने एकदा स्पष्टपणे ती ड्रग्जचं सेवन करत नाही असं स्पष्टपणे म्हटलं होतं.
काजोल अनेकदा कार्यक्रमांमध्ये, मुलाखतींमध्ये तिच्या प्रतिक्रिया, मतं ठामपणे मांडते. अभिनेत्री विविध विषयांबद्दल बोलत असते. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना तिने एकदा तिच्या दिनचर्येबद्दल बोलताना ड्रग्जचं सेवन करत नसल्याचं म्हटलं होतं आणि तिच्या झोपण्याच्या सवयीबद्दल तसेच ती एका विशिष्ट वेळेनंतर काम करत नाही असंही म्हटलं होतं.
मी आळशी आहे – काजोल
मुलाखतीत काजोलला तिने करिअरमधून घेतलेल्या ब्रेकबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी आळशी व्यक्ती आहे. जर तुम्ही माझ्या चित्रपटांची यादी पाहिली तर मी सगळ्यात कमी चित्रपट केलेली अभिनेत्री असेन.” यावेळी तिच्याबरोबर उपस्थित असलेल्या क्रिती सेनॉनकडे पाहत ती म्हणाली, “काही वर्षांनंतर तुझ्या चित्रपटांची यादी माझ्यापेक्षा मोठी असेन.”
काजोल पुढे म्हणाली, “प्रत्येक जण वर्षाला निदान चार-पाच चित्रपट करतात. मी एका वर्षाला फक्त एकच चित्रपट केला आहे.” यावर तिला आळशीपणा व्यतिरिक्त असा निर्णय घेण्यामागचं काही दुसरं कारण होतं का असं विचारल्यानंतर ती म्हणाली,”माझी आई, माझी आजी आणि माझ्या आईची आजी या सगळ्यांचा एक दृष्टीकोण होता की काम तुमच्या आयुष्याचा भाग असला पाहिजा काम तुमच्या आयुष्यचं ध्येय नाही पाहिजे. जर घरी कधी माझ्यासाठी फोन आला तर त्या तो फोन उचलायच्या आणि काजोल घरी आहे का असं विचारल्यानंतर ती कामाला गेलीये असं उत्तर द्यायच्या.” काजोलने यावेळी मराठीत हा संवाद साधला.
काजोल पुढे म्हणाली, “काम माझ्या आयुष्याचा भाग आहे त्यामुळे हो मी ब्रेक घेतले आहेत. मला तो वेळ हवा होता. मला लग्न करायचं होतं, मला मुलं हवी होती. मला कामाला माझ्या आयुष्याचा भाग बनवायचा होता आणि मी ते केलं आहे”.
मी धूम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही – काजोल
पुढे अभिनेत्रीने तिच्या काम करण्याच्या वेळेबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “मी अशा विचित्र लोकांपैकी एक आहे जे रात्री साडे नऊ वाजता झोपायला जातात. कारण एकावेळेनंतर मी काम करत नाही. मी आळशी आहे. मला संध्याकाळी झोप काढायला आवडते. मी दिवसाला किती ग्लास पाणी पिते याचा हिशोब ठेवते आणि काळजी घेते की मी तीन ते साडे तीन लिटर पाणी पिणार. त्यामुळे हो मी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करते. मी धूम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही. मी ड्रग्जही घेत नाही. जे ड्रग्ज घेते ते कायदेशीर रित्या मान्य आहे कारण ते ड्रग्ज म्हणजे कॉफी आहे आणि अशाच पद्धतीने मी जगत आलीये.”
