दिग्दर्शक कुणाल कोहलीने २००६ मधील आपल्या ‘फना’ या चित्रपटासाठी काजोलला घेण्याचा विचार जवळपास सोडून दिला होता. कारण काजोल त्यावेळी नुकतीच आई झाली होती. पण कुणालने तिला चित्रपटाची कथा ऐकवली आणि तिने सिनेमा करायला होकार देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण या सिनेमातील ‘देखो ना’ या पावसातील रोमँटिक गाण्याबद्दल तिला थोडी अडचण होती.

कुणालने ‘स्क्रीन स्पॉटलाईट’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटात काजोलने एका अंध मुलीची भूमिका साकारली होती. याआधी राणी मुखर्जीने ‘ब्लॅक’ चित्रपटात अशीच भूमिका केली होती, पण कुणालला काजोलची भूमिका वेगळी दाखवायची होती. तो म्हणाला, “आम्ही तिला काळा चष्मा दिला नाही, कारण मला तिचे डोळे प्रेक्षकांना दाखवायचे होते. तसंच, या सिनेमात या अंध मुलीवर चित्रित केलेलं ‘देखो ना’ हे पावसातील रोमँटिक गाणंदेखील होतं, असं गाणं आधी बनलं नव्हतं.”

काजोल दिग्दर्शकाला काय म्हणाली होती?

गाण्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी काजोलने दिग्दर्शक कुणाल कोहलीला याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. “बघा, मला हे गाणं माझ्या सासू-सासऱ्यांबरोबर पाहायचं आहे. त्यामुळे गाण्यात रोमान्स ठेवा, पण मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा.”

Award Banner

कुणालचा त्या रोमँटिक गाण्याबद्दलचा दृष्टीकोन

कुणाल कोहली पुढे म्हणाला की मला मात्र सिनेमात काहीच कमतरता ठेवायची नव्हती. ती मुलगी जर अंध असेल तर काय झालं? दिव्यांग व्यक्तीही सामान्य व्यक्तीप्रमाणे प्रेमात पडू शकते. त्यामुळे, मला त्या प्रेमावर कोणतीही बंधनं घालायची नव्हती. मला ते गाणं उदास किंवा निराशाजनक बनवायचं नव्हतं.

फना चित्रपटात एका इंटेलिजन्स ऑफिसरच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी तबूची निवड करण्यात आली होती. आमिर खानने साकारलेल्या दहशतवादी पात्राला पकडण्यासाठी एक त्याची प्रेयसी आणि दुसरी भारतीय सुरक्षा दलातील अधिकारी अशा दोन महिलांच्या भूमिका होत्या. तबूने या भूमिकेचे महत्त्व ओळखून ती अत्यंत प्रभावीपणे साकारली होती.

या सिनेमात सतीश शाह यांनी कर्नलची भूमिका साकारली होती. कुणाल कोहली आणि सतीश शाह यांची जुनी मैत्री असल्याने त्यांनी एका फोनवर या भूमिकेसाठी होकार दिला होता. त्यांची व्यक्तिरेखा इतकी प्रभावी होती की पडद्यावर त्यांचा मृत्यू होतो तेव्हा प्रेक्षकांना खरोखर वाईट वाटलं होतं.