प्रभासचा 'कल्की : २८९८ एडी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत धुमाकूळ घालताना दिसत आहे. २७ जून २०२४ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ३१ व्या दिवशीदेखील बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रदर्शित झाल्यापासून महिन्यानंतरही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात तो यशस्वी ठरला आहे. पाचव्या शनिवारी या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ६२७.८५ कोटी रुपये झाली आहे. शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटावर कल्की: २८९८ एडी करणार मात? नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की : २८९८ एडी' या चित्रपटाने चित्रपटगृहात एक महिना पूर्ण केला असून कमाईच्या बाबतीत सातत्य राखले आहे. याचप्रकारे 'कल्की : २८९८ एडी' चित्रपट कमाई करत राहिला तर गेल्यावर्षी शाहरूख खानचा हिट ठरलेला 'जवान' चित्रपटावर मात करू शकतो. 'जवान'ने भारतात ६४०.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. याबरोबरच, 'कल्की : २८९८ एडी' या चित्रपटाने जगभरात ११०० कोटींचा गल्ला जमवत शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला मागे टाकले आहे. मात्र, 'जवान' चित्रपटाने ११६० कोटींची कमाई करत विक्रम रचला होता, जगभरात इतकी मोठी कमाई करणारा हा पाचवा चित्रपट ठरला होता. तो विक्रम मोडण्यासाठी 'कल्की' चित्रपटाला आणखी कमाई करणे आवश्यक आहे. प्रभासचाच 'बाहुबली २' हा चित्रपट आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. आता 'कल्की : २८९८ एडी' हा चित्रपट या चित्रपटांचे विक्रम मोडत नवीन विक्रम तयार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा: Video : कॅमेरे पाहताच खुदकन हसली अन्…; रणबीर- आलियाच्या लेकीचा गोड अंदाज! राहाला पाहून नेटकरी म्हणाले… अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा चित्रपट आणि विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला 'बॅड न्यूज' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'कल्की' चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल असे म्हटले जात होते, मात्र असे घडताना दिसले नाही. हा चित्रपट प्रभाससाठी महत्त्वाचा ठरला आहे. या लोकप्रिय अभिनेत्याला काही काळापासून सतत अपयशाचा सामना करावा लागत होता. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २ : द कन्क्लुजन’ या चित्रपटानंतर ‘सालार’चा अपवाद सोडता, त्याला सतत अपयशाला सामोरे जावे लागत होते. मात्र, ‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे.‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपट नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला असून, या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन, प्रभास, दिशा पटानी, मृणाल ठाकूर, दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.