Kalki Koechlin on Mental Health and Divorce: अभिनेत्री कल्की कोचलिन ही तिच्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. अनेकदा ती मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलते. तसेच ती तिचे वैयक्तिक अनुभव सांगत असताना दिसते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या एक्स-पतीबद्दल म्हणजेच लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपबद्दल वक्तव्य केले आहे. घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्यात कसे नाते आहे, याबद्दल तिने सांगितले.

“खूप प्रयत्न करावे लागले….”

अभिनेत्रीने एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने घटस्फोट झाल्यानंतरची परिस्थिती कशी होती याबद्दल सांगितले. ती म्हणाली की खूप प्रयत्न करावे लागले, थेरेपीही घ्यावी लागली, पण थेरेपी घेतल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, फक्त तोच एक मार्ग आहे असे मला वाटत नव्हते. मला असं वाटत नाही की फक्त थेरेपीनेच सगळं ठीक होते. सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही खूप दुःखातून जात असता, तेव्हा थेरेपी घेणेही कठीण होते. कारण काही काळ तुम्हाला त्या दुःखाला अनुभवणे गरजेचे असते. थेरेपी दीर्घकालीन मदत करते, त्यामुळे थेरेपीचा पर्याय मी नक्कीच सुचवेन.”

“मनात राग धरून…”

पुढे ती असेही म्हणाली, “दीर्घकाळाचा विचार करता तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांबद्दल मनात राग धरून ठेवायचा नसेल तर थेरेपी एक उत्तम पर्याय आहे, कारण लोक तुम्हाला कधी ना कधी दुखावणारच; त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन पातळीवर ही एक प्रभावी पद्धत आहे. गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा तुम्ही एकमेकांना खूप दुखावलेले असते, तेव्हा काही काळ न बोलणे खूप महत्त्वाचे असते.”

वेगळे झाल्यानंतर अंतर ठेवणेदेखील महत्त्वाचे असते, असे सांगत कल्की म्हणाली, “तुम्ही जितका काळ रिलेशनशिपमध्ये असता, त्याच्या अर्धा वेळ तुम्ही एकमेकांपासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही सहा महिने एकत्र असाल, तर तुम्ही तीन महिने बोलू नका, भेटू नका. तुम्हाला त्या वेळेची गरज असते.”

ज्या व्यक्तीपासून वेगळे झाले आहात, त्यापासून दूर राहणे का महत्त्वाचे आहे, यावर अभिनेत्री म्हणाली, “राग, वेदना आणि निराशा या भावना त्या व्यक्तीजवळ व्यक्त करण्याऐवजी जवळचे मित्र किंवा कुटुंबीय यांच्याबरोबर त्या गोष्टी व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या नात्यातील चांगल्या गोष्टी आठवायला लागतील, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा भेटू शकता.”

याआधी झूमला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणालेली की, घटस्फोटानंतर सुरुवातीची काही वर्षे आमच्यासाठी सोपी नव्हती. आपण एकमेकांच्या आयुष्यापासून दूर राहिले पाहिजे याची जाणीव झाली.

दरम्यान, अनुराग कश्यप व कल्की कोचलिन यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.