कलाकार त्यांच्या अभिनयाबरोबर त्यांच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असतात. अनेकदा ते करिअरमधील अनुभव सांगतात, काही वेळा ते त्यांच्या खासगी आयुष्यातील अनुभवही सांगतात. या निमित्ताने त्यांची एक वेगळी बाजू पाहायला मिळते.

अभिनेत्री कल्की कोचलीन ही जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तितकीच ती तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिने अनेकदा लग्न, घटस्फोट, मानसिक आरोग्य अशा विविध गोष्टींवर वक्तव्य केले आहे. याबरोबर अविवाहित असताना तिला मुलगी झाली होती, याबद्दलही तिने वक्तव्य केले होते.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणालेली, “लग्न केलेले नसताना गरोदर असणे किंवा आई होणे ही गोष्ट सामान्य आहे; पण अनेक लोकांसाठी ही फार मोठी गोष्ट आहे. मी ज्यावेळी गरोदर होते, त्यावेळी मी लग्न केले नव्हते. त्यावर लोक मला असे म्हणत असत की, तू लग्न न करताही कशी गरोदर आहेस? १८ व्या शतकात अशा गोष्टी बोलल्या जात असत. लोक अजूनही त्याच काळातील विचारांबरोबर कसे राहत आहेत, हे मला समजत नाही.

२०२० मध्ये कल्की कोचलीनला मुलगी झाली. कल्की त्यावेळी अविवाहित होती. पण इस्रायली संगीतकार गाय हर्शबर्गबरोबर ती दीर्घकाळापासून नात्यात होती. मुलीच्या जन्मानंतर काही काळाने त्यांनी लग्न केल्याचे जाहीर केले होते.

“अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र…”

पुढे कल्की म्हणालेली, “मी त्यावेळी माझ्या जोडीदाराबरोबर राहत होते. अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र होतो. आम्हाला मूल झाले, ही सामान्य गोष्ट आहे. आम्ही एकत्र राहत होतो, त्यामुळे मी गरोदर असणे, साहजिक होते. आपण अशा सोसायटीत राहतो, ज्यामध्ये असे दाखवले जाते की, अशा गोष्टी होऊ नयेत. मला वाटते की, आपण कधी कधी समाजात खोट्या गोष्टी जगत असतो, जिथे आपण असे भासवतो की, या गोष्टी घडत नाहीत. आपली लोकसंख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या गोष्टी घडतात.”

लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव होता का? यावर कल्की म्हणाली, “जेव्हा तुम्ही लहान असता, त्यावेळी कुटुंबाकडून तो दबाव जाणवतो. पण, माझ्यावर कधी लग्न करण्यासाठी फार दबाव होता, असे जाणवले नाही.”

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर तिने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

दरम्यान, कल्की कोचलीनला ‘देव डी’, ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. विशेषत: ‘यह जवानी है दिवानी’ मालिकेतील तिची आदिती ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.