Kalki Koechlin interview : ‘ये जवानी हैं दिवानी’फेम लोकप्रिय अभिनेत्री कल्की कोचलिन ही तिचा अभिनय आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये असते. अनेकदा ती तिची मते स्पष्टपणे मांडताना दिसून येते. अनेक वर्षांपासून सिनेविश्वामध्ये काम करीत असलेल्या कल्कीने तिचे बॉलीवूडमधील अनुभव सांगितले आहेत. एका सिनेमाच्या निर्मात्याने तिला हसताना चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असल्यामुळे फिलर्स बसवून घेण्याचा सल्ला दिला होता. या कटू अनुभवाबद्दल कल्की कोचलिनने खुलासा केला आहे.

कल्की कोचलिनने यूट्युबर व विनोदी अभिनेत्री लिली सिंगला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेविश्वातील अनुभव सांगितले आहेत. यावेळी एका निर्मात्याबरोबर मीटिंगसाठी ती एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. त्यावेळी एका निर्मात्याने थेट तिच्या दिसण्यावर कमेंट करत चेहऱ्यावर फिलर्स बसवण्याचा सल्ला दिला होता. निर्मात्याच्या या बोलण्यामुळे कल्कीला प्रचंड राग आला होता. तसेच ती व्यक्ती एक सुंदर अभिनेत्री, जी त्याची एक्स गर्लफ्रेंड होती, तिच्याबद्दलसुद्धा विधान करीत असल्याचे कल्कीने नमूद केले.

कल्कीला निर्मात्याबाबत आला होता वाईट अनुभव

कल्की म्हणाली, “मला आठवतंय, मी एका निर्मात्याबरोबर जेवायला गेले होते. तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगत होता. खरं तर ती एक सुंदर अभिनेत्री आहे. पण त्यानं सांगितलं की, या अभिनेत्रीनं खूप जास्त बोटॉक्स केलंय आणि त्यामुळे तिचा चेहरा खूपच खराब दिसू लागलाय. हे संभाषण नंतर इतकं वाईट मार्गावर गेलं की, तो माझ्या दिसण्यावरसुद्धा बोलू लागला. त्यावेळी मात्र मला प्रचंड राग आला होता.”

कल्कीला निर्मात्यांनी दिला होता फिलर्स करून घेण्याचा सल्ला

पुढे ती म्हणाली, “तो निर्माता मला अगदी सहजपणे म्हणाला, ‘तुझ्या हसण्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत आहेत. चेहऱ्या पडणाऱ्या लाइन्ससाठी तुला फक्त थोड्या ‘फिलर’ची गरज आहे.’ त्यानं असं म्हणताच मला खूप राग आला आणि माझ्या हातात असलेल्या काटा-चमच्यानं (फोर्क) त्याला मारावं, असं वाटलं. पण असं काहीही न करता, मी स्वतःला शांत केलं आणि जेवण करीत राहिले. पुढे मी त्याला म्हणाले, ‘असं असेल तर मी जास्त न हसलेलंच बरं आहे.'”

कल्की म्हणाली, “या प्रसंगानंतर मला खूप राग आला होता. त्याही परिस्थितीमध्ये तो जोक्स करत राहिला. त्यामुळे मी त्याच्याकडून अजून रागानं पाहिलं आणि त्यालाही माझ्या नजरेतला राग लक्षात आला. त्यानंतर त्यानं पुन्हा कधीच हा विषय काढला नाही. पण, काही लोक अशा प्रकारे थेट कमेंट्स करत असतात.”

कल्कीला त्या निर्मात्याला त्याच वेळी योग्य उत्तर का नाही दिलं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मला त्याच काहीच वाईट वाटत नाही. मी हा प्रसंग माझ्या ‘आय अॅम ओके’ या शोमध्ये सांगितला आहे. अनेक महिलांना असा अनुभव आला असेल. प्रत्येक वेळी समोरच्याला तिथल्या तिथे जागेवर लगेच उत्तर देता येत नाही. आपल्या घरातही अनेकदा मतभेद असतात; पण प्रत्येक गोष्टीवर वाद घालायचा नसतो. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावर बोलणंच योग्य ठरतं.”