Kalpana Iyer dance on Ramba Ho song: ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना कल्पना अय्यर यांच्या एका व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका कौटुंबिक लग्नसमारंभात त्यांनी ‘रंबा हो हो हो’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा डान्स पाहून, त्यांची ऊर्जा पाहून फक्त प्रेक्षकच नाही तर इंडस्ट्रीतील कलाकारही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

कल्पना अय्यर यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १९८१ ला प्रदर्शित झालेल्या अरमान या चित्रपटातील ‘रंबा हो हो हो’ या गाण्यामुळे कल्पना अय्यर घराघरात पोहोचल्या होत्या. विशेष म्हणजे रणवीर सिंगच्या ब्लॉकबस्टर धुरंधर चित्रपटात हे गाणे पाहायला मिळाले. त्यामुळे हे गाणे सध्या चर्चेत होते.

हा व्हिडीओ शेअर करताना कल्पना अय्यर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, “एका मैत्रिणीने मला हा काल रात्रीचा व्हिडीओ पाठवला. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी डान्स केला. याचे कारण म्हणजे मी खूप दिवस डान्स केला नव्हता. ही संध्याकाळ खूप खास होती.”

व्हिडीओमध्ये कल्पना अय्यर यांनी जांभळ्या रंगाची साडी नेसल्याचे पाहायला मिळाले. त्या जेव्हा डान्स करत होत्या त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सोशल मीडियावर नेटकरी त्यांचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कलाकार काय म्हणाले?

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने या व्हिडीओवर कमेंट करत सर्वोत्तम असे लिहिले. तर दिव्या दत्ताने हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले. कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसने डान्सिंग क्वीन अशी कमेंट केली आहे. डेलनाझ इराणीने द ओजी (The OG)अशी कमेंट केली आहे.

कल्पना अय्यर यांचा बॉलीवूडमधील प्रवास

‘रंबा हो हो हो’ या गाण्यातून कल्पना अय्यर यांना लोकप्रियता मिळाली होती. पण याबरोबरच त्यांनी कल्पना अय्यर यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात सत्ते पे सत्ता, बडे दिलवाला, हम पाँच, लाडला, अंजाम अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. हम साथ साथ हैं या सुपरहिट चित्रपटातील संगीता या भूमिकेसाठी त्या विशेष लक्षात राहिल्या. रीमा लागू यांच्या पात्राच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका त्यांनी साकारली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, १९९९ नंतर कल्पना अय्यर यांनी बॉलिवूड सोडले आणि त्या दुबईला स्थायिक झाल्या.

=