Aamir Khan And Kalpana Iyer: ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना अय्यर काही दिवसांपूर्वी त्यांच्या डान्स व्हिडीओमुळे मोठ्या चर्चेत आल्या होत्या. ‘रम्बा हो’ गाण्यावर त्यांनी केलेला डान्स चर्चेचा विषय ठरला होता.

विशेष म्हणजे १९८१ ला प्रदर्शित झालेल्या ‘अरमान’ चित्रपटातील ‘रम्बा हो’ या गाण्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? आमिर खानचा गाजलेला ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातसुद्धा त्या दिसल्या होत्या. ‘परदेसी’ या लोकप्रिय गाण्यात त्या दिसल्या होत्या.

आता कल्पना अय्यर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. कल्पना अय्यर यांनी नुकतीच सिंपली पंकजला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “राजा हिंदुस्तानीमधील माझा पोशाख पाहिला की मला नेहमीच मनीष मल्होत्रा यांची खूप आठवण येते. तेव्हा ते तरुण होते आणि त्यांनी नुकतीच कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी माझा पोशाख खूप प्रेम आणि जिव्हाळ्याने तयार केला होता.”

“तो खूप शिस्तबद्ध आणि प्रामाणिक आहे”

आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत त्या म्हणाल्या, “आमिर खानबरोबरच्या खूप गोड आठवणी आहेत. लोक म्हणतात तो खूप कटकटी स्वभावाचा आहे, पण मला तसे वाटत नाही. तो खूप प्रामाणिक, शिस्तबद्ध आहे. त्याला काही गोष्टी ठराविक पद्धतीने झाल्या पाहिजेत असे वाटते, त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. जर त्याला उत्तम भूमिका साकारायची असेल, भूमिकेशी प्रामाणिक राहायचे असेल आणि सहकलाकारांनाही बरोबर घेऊन जायचे असेल, तर त्यात काहीच चुकीचे नाही.”

‘परदेसी’ गाण्याच्या शूटिंगची आठवण सांगत कल्पना अय्यर म्हणाल्या, “त्या गाण्याचे शूटिंग आम्ही रात्री केले. त्यामध्ये काही बदल करायचे होते, आमिरने मला त्याबद्दल सुचवले होते; मीसुद्धा त्याने सांगितल्याप्रमाणे बदल केले.”

कल्पना अय्यर यांनी ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात आमिर खानबरोबर पहिल्यांदाच काम केले असे नाही. त्याआधी १९९० मधील ‘तुम मेरे हो’ या चित्रपटात त्यांनी त्याच्याबरोबर काम केले होते. कल्पना अय्यर म्हणाल्या, “आमिर माझ्यासाठी नेहमीच परफेक्शनिस्ट आहे. ‘तुम मेरे हो’च्या वेळीही तो तसाच होता. ‘राजा हिंदुस्तानी’मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा एकत्र काम केले, तेव्हाही तो तसाच होता. गोष्टी परफेक्ट असल्या पाहिजेत अशी जिद्द त्याच्यात होती. महत्त्वाचे म्हणजे ती गोष्ट फक्त त्याच्या स्वत:पर्यंत मर्यादित नव्हती. इतरांनीही तसेच असावे असे त्याला वाटत असते. अनेकदा त्याचे तसे वागणे कठोर वाटू शकते, पण त्यामुळे सर्वांचाच फायदा होतो.”

त्या पुढे म्हणाल्या, “‘राजा हिंदुस्तानी’मध्ये काम करताना त्याने जे मला बदल सांगितले, त्याचा मला उपयोग झाला. जेव्हा आपण अभिनय करत असतो तेव्हा कोणी बदल सुचवले तर त्याचा त्रास होतो, पण शेवटी त्याचा फायदा होतो. गोष्टी अधिक चांगल्या होतात. मला आमिरबद्दल नेहमीच आदर वाटतो”, असे म्हणत कल्पना अय्यर यांनी आमिर खानबद्दल वक्तव्य केले.