Kalpana Iyer on ghosting: ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना अय्यर काही दिवसांपूर्वी चर्चेत आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी एका लग्नात त्यांनी ‘रंभा हो’ या गाण्यावर डान्स केला होता. त्यांचे हे गाणे प्रचंड गाजले होते.त्याचप्रमाणे त्यांचा हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तसेच, त्यांच्या उत्साहाचे आणि डान्सचे कौतुक केले.
कल्पना अय्यर यांचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी अनेक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पुन्हा अभिनयात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आपला भूमिकांसाठी विचार करावा,असेही त्या म्हणाल्या होत्या. आता त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
“पण जर ते काम होणार नसेल, तर मला…”
त्यांनी लिहिले, “मी प्रत्येक गोष्टीत सभ्य राहण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत, माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्याकडे त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. पण, जेव्हा लोक अचानक संपर्क तोडतात, त्याचा त्रास होतो. माझ्या वाटेला जे येतं ते मी प्रामाणिकपणे करते. मला कोणीतरी खूप महत्त्व द्यावे, किंवा मान सन्मान द्यावा अशी मी अपेक्षा करत नाही. पण, आदर आणि सभ्यता मात्र राखली पाहिजे. मला वाटतं की फार मोठी अपेक्षा नाही.”
त्यांनी पुढे लिहिले, “मी एक माणूस आहे आणि मला कोणत्याही सहानुभूतीची किंवा विशेष वागणुकीची अपेक्षा नाही. मला फक्त प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने काम करायचं आहे. तुम्ही माझ्याशी कामासाठी संपर्क साधलात, मी त्याबद्दल आभारी आहे. पण जर ते काम होणार नसेल, तर मला सांगा, कळवा, माझ्याशी चर्चा करा. मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. कदाचित मी काही बदल करण्याचा प्रयत्न करेन किंवा दुसरा पर्याय सुचवेन. कदाचित त्यातून तुमचं आणि माझं दोघांचंही काम होऊ शकेल. मी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेत नाहीये, कारण या पोस्टचा उद्देश तो नाही. मी ७० वर्षांची आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्याशी योग्य आणि सभ्य पद्धतीने वागले गेले पाहिजे आणि मला वाटतं, ही अपेक्षा मी तुमच्याकडून नक्कीच करू शकते”, असे म्हणत कल्पना अय्यर यांनी आपबीती सांगितली. तसेच, चर्चा करून गोष्टी सोडवल्या पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

कल्पना अय्यर यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी कामाला सुरुवात केली होती. देव आनंद यांच्या ‘लूटमार’ या चित्रपटातील डान्समधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘रंभा हो’ या आयकॉनिक गाण्यामुळे त्या घराघरात पोहोचल्या. मात्र, कालांतराने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील कामाच्या ऑफर्स कमी होत गेल्यानंतर कल्पना १९९९ मध्ये दुबईला स्थायिक झाल्या. गेल्या २७ वर्षांपासून त्या दुबईतच राहतात.
अलीकडेच ‘रंभा हो’ हे गाणं ‘धुरंधर’ चित्रपटात वापरण्यात आल्यानंतर कल्पना पुन्हा एकदा चर्चेत आल्या. यापूर्वी ‘Simply Pankaj’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कल्पना यांनी पुन्हा अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “मी काम करण्यासाठी तयार आहे. मी कधीच कामाला नकार दिलेला नाही. फक्त माझ्या वयाला साजेशा भूमिका द्या. एखादी भूमिका फक्त एका मिनिटाची असेल आणि ती माझ्यासाठी योग्य असेल, तर मी ती का करणार नाही? ‘हम साथ साथ हैं’नंतर मी कामाची वाट पाहत आहे”, असे त्या म्हणाल्या होत्या.
