Bharat Bhhagya Viddhaata anjali kulthe real life story अभिनेत्री कंगना रणौत यांचा ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट १२ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कामा रुग्णालयातील सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर धैर्याने रुग्णाचे प्राण वाचवणाऱ्या नर्सची कहाणी यामधून मांडण्यात आली आहे. त्यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासह गिरीजा ओक, स्मिता तांबे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे कंगना यांनी साकारलेली प्रमुख नर्सची भूमिका धाडसी परिचारिका अंजली कुलथे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्या प्रसंगाची आठवण सांगताना अंजली कुलथे यांनी अनेक धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत.
मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्ल्यात अनेकांनी धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवीत शेकडो लोकांचे प्राण वाचवले. पण, या धाडसी व्यक्तींच्या शौर्यकथा लोकांपर्यंत फारशा पोहोचल्या नाहीत. अशाच एकाधाडसी परिचारिका म्हणजे अंजली कुलथे. कामा रुग्णालयात जीवाची पर्वा न करता, त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले होते. ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या माध्यमातून १८ वर्षांनंतर नर्स अंजली कुलथे यांची धाडसी कामगिरी सर्वांसमोर आली आहे. अंजली कुलथे यांनी दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नेमके काय घडले होते ते सांगितले आहे.
२० गरोदर महिलांचे वाचवले होते प्राण
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये कुलाबा येथील लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एकाच वेळी हल्ले झाले. त्यानंतर कामा रुग्णालयाच्या दिशेने वळले. त्यावेळी रुग्णालयात अंजली कुलथे ड्युटीवर होत्या. त्या जीवघेण्या गोळीबारात परिचारिका अंजली कुलथे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून २० गरोदर महिलांचे प्राण वाचवले होते. एवढेच नव्हे, तर एका महिलेची सुरक्षित प्रसूती करवून, माणुसकीचे उत्तम उदाहरणही सर्वांसमोर ठेवले.
‘त्या’ रात्री काय घडले होते?
एनडीटीव्हीशी आधी झालेल्या एका मुलाखतीमध्ये अंजली कुलथे यांनी घडलेला प्रसंग सांगितला होता. अंजली कुलथे म्हणाल्या की, रात्रीच्या ९.३० च्या सुमारास दहशतवादी कामा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती कळली. त्यानंतर काहीच वेळामध्ये गोळीबार होत असल्याचे आवाज येऊ लागले. रुग्णालयाच्या मागच्या भागातून गोळीबार केल्याचे आवाज ऐकू येत होते. खिडकीतून पाहिल्यावर दोन दहशतवादी पळत असून, त्यांच्यावर पोलीस गोळीबार करताना दिसले होते; पण उंचीने कमी असलेले गेट सहज ओलांडून दहशतवादी रुग्णालयाच्या आवारामध्ये आल्याचे अंजली कुलथे यांनी सांगितले होते.
१० बाय १०च्या खोलीमध्ये २० गरोदर महिलांना केले एकत्र
दहशतवादी हल्ला झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता, त्यांनी आपले कर्तृत्व पार पाडले. रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वॉर्डमधील २० गर्भवती महिलांना एकत्र करून, एका छोट्या पॅन्ट्रीमध्ये नेले. दिवे बंद करून सर्वांचे मोबाईल फोन बंद करण्यात आले. रुग्णालयामध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला सुरू असताना सर्व जण अंधारात शांतपणे बसून राहिले. अंजली कुलथे यांनी वॉर्डचा मुख्य दरवाजा बंद करून, १० बाय १०च्या खोलीमध्ये २० गरोदर महिलांना बसवले.
अशा स्थितीमध्येही केली प्रसुती
पुढे अंजली यांनी सांगितले की, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि डॉक्टरांनी वॉर्डमध्ये येण्यास नकार दिला. कारण- तोपर्यंत रुग्णालयाच्या आतच गोळीबार सुरू झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, अंजली कुलथे यांनी त्या महिलेला एकेक पायरी चढवून जिन्यावरून प्रसूती कक्षात (लेबर रूममध्ये) नेले आणि पहाटेपर्यंत त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला.
…ती रात्र कधीही विसरणार नाही. – अंजली
त्या घटनेबाबत सांगताना अंजली कुलथे यांनी, ती रात्र आमच्या सर्वांसाठी अत्यंत धक्कादायक होती. त्यावेळी रुग्णालयात काम करणाऱ्या आमच्यापैकी कोणालाही ती रात्र कधीच विसरता येणार नाही. ज्या प्रकारे त्यांनी हँड ग्रेनेड फेकून, गोळीबार करीत लोकांचे जीव घेतले. ते दृश्य आमच्यापैकी कोणालाही कधीच विसरता येणार नाही. संपूर्ण देशासाठी ती एक अत्यंत दुःखद आणि भयावह रात्र होती, अशी आठवण सांगितली होती.
१८ वर्षांनंतर ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटातून मांडली शौर्यगाथा
कामा रुग्णालयात २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री सलग पाच तास हल्लेखोरांचा हल्ला सुरू होता. दोन सुरक्षा रक्षकांसह रुग्णालयातील आणखी एका कर्मचाऱ्याचाही त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या कठीण प्रसंगी नर्स अंजली कुलथे यांनी दाखवलेले शौर्य आणि धैर्य याचीच गोष्ट ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
